भविष्यात गोकुळचे गाय दूध गोव्यात थेट ग्राहकांपर्यंत ! चेअरमनसह संचालकांची मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत चर्चा !!
schedule03 Jul 25 person by visibility 43 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पणजी येथील मुख्यमंत्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गोकुळतर्फे मुख्यमंत्री सावंत यांची करवीर निवासिनी अंबाबाईदेवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चेत गोकुळ व गोवा मिल्क फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने गोवा राज्यात गाय दुधाचे मूल्यवर्धित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदार व स्थिर पुरवठा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्याची रूपरेषा तयार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
तसेच, गोवा राज्य शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना गाय दूध पावडर किंवा दुधाचा समावेश करण्याबाबत, तसेच गोवा राज्यातील शेती उत्पन्न बाजार समितीमार्फत गोकुळचे गाय दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याबाबत, सध्या दुधावर आकारल्या जाणाऱ्या करात सवलत मिळावी यासंदर्भातही चर्चा झाली.
याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत. गोव्यातील नागरिक तसेच पर्यटकांना गोकुळच्या उत्पादनांचा लाभ मिळावा यासाठी गोवा मिल्क फेडरेशन आणि गोकुळ यांच्यामार्फत काही संयुक्त कार्यक्रम राबविण्यात येतील. शासनाच्या वतीने सहकार्य व मार्गदर्शन निश्चित केले जाईल.’
चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोव्यासारख्या प्रगत आणि जागरूक राज्यात गोकुळचे उत्पादने पोहोचवणे ही केवळ व्यवसायिक संधी नसून, गुणवत्तेची बांधिलकीही आहे. गोवा राज्य शासनाने दिलेले सहकार्य आम्हाला अधिक प्रेरणा देणारे आहे. याप्रसंगी संघाचे संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच सचिन पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.