जिद्द- चिकाटीतून यशाची निर्मिती होते : अवर सचिव प्रमोद पाटील
schedule31 Mar 24 person by visibility 240 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज,पेठ वडगाव या विद्यालयाला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय,मुंबईचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये कोल्हापूर विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे याबद्दल अभिनंदन केले.
तसेच आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये राबवले जाणारे उपक्रम पाहून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी विविध उपक्रमांचे कौतुक केले. आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर आपण जगातील कोणत्याही संकटावरती मात करू शकतो हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी आपले शालेय जीवन व बालपणाबद्दल माहिती सांगितली. तसेच स्वतःच्या आवडीनिवडी बद्दल माहिती सांगितली.
माणसाच्या आयुष्यात व्यायामाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, जिद्द व चिकाटी या संबंधित अनेक उदाहरणे सांगितली त्यामुळे विद्यार्थी प्रेरित झाले. तसेच विद्यार्थ्यांना कॉम्रेड मॅरेथॉन या स्पर्धेसाठी घ्यावे लागणारे कष्ट याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी आदर्श शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. डी एस घुगरे, मुख्याध्यापिका सौ.एम.डी.घुगरे, कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूरचे संचालक मदन निकम, ग्रीन व्हॅली प्रशालेचे मुख्याध्यापक आर.बी.शिवई, पर्यवेक्षक एस.जी.जाधव उपस्थित होते.