ईव्हीएमला विरोध म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार, प्रकाश जावडेकरांचे इंडिया आघाडीवर टीकास्त्र
schedule20 Dec 24 person by visibility 36 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लोकसभेला जादा जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम प्रक्रिया चांगली आणि विधानसभेला अपयश आले की ईव्हीएम मशिन वाइट हा इंडिया आघाडीचा कांगावा म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’असा प्रकार आहे. इंडिया आघाडी व काँग्रेसने विधानसभेच्या पराभवावरुन ईव्हीएमला दोष न देता आत्मचिंतन करावे. लोकांनी का झिडकारले हे शोधावे’असा टोला माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगाविला.
जावडेकर हे गुरुवारी (१९ डिसेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर होते. याप्रसंगी त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन, संसदेत काँग्रेस खासदारांचा गोंधळ, विधानसभा निवडणुकीचा निकाल या अनुषंगाने बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडून भाजप खासदाराला झालेली धक्काबुक्कीचा प्रकार हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे. काँग्रेसच्या खासदारांनी एक लक्षात ठेवावे की संसद परिसर हा काही आखाडा नव्हे. लोकांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याने ते वैफल्यग्रस्त बनले आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्ष ही काँग्रेसचे नेतृत्व मानायला तयार नाहीत. ’ याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले.
वन नेशन वन इलेक्शनवरुनही विरोधक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. वास्तविक देशातील जनता सूज्ञ आहे. मात्र इंडिया आघाडीतील नेते मंडळी लोकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. देशातील अनेक राज्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतात. यामुळे वन नेशन वन इलेक्शनला विरोध करणे योग्य नाही. असेही जावडेकर म्हणाले.
पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, धनश्री तोडकर, विशाल शिराळकर, विजय अग्रवाल, डॉ. सदानंद राजवर्धन अनिल कामत आदी उपस्थित होते.