कोल्हापुरात एक लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ
schedule20 Dec 24 person by visibility 44 categoryशैक्षणिकउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येत्या फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ४ हजार ४५८ इतक्या परीक्षार्थींना त्यांना चालू डिसेंबर महिन्यात शाळा स्तरावर आणि फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षाकेंद्र स्तरावर कॉपी न करण्याची शपथ देण्यात येणार आहे. शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यासह संबंधित सर्व घटकांना परीक्षेची इत्यंभूत माहिती व्हावी, यासाठी विभागीय मंडळांने शाळा स्तरावर चालू वर्षी प्रथमतःच बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यानिमित्ताने २४ डिसेंबर पर्यंत शाळास्तरावर बोर्ड परीक्षेचा जागर होत आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर १७ डिसेंबर रोजी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेशी संबंधित सर्व मुद्द्यांची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. एवढेच नव्हे तर कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त परीक्षा आयोजनासाठी कडक कारवाईच्या सूचना आणि गुणात्मक सुधारणेसाठी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती व सर्व घटकांची मानसिकता बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यात ९७७ माध्यमिक शाळांमधून तर ३७९ उच्च माध्यमिक अशा एकूण १३५६ विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. त्यातून इयत्ता दहावी करिता ५४ हजार ६४४ आणि इयत्ता बारावी करिता ४९ हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
शाळास्तरावर घ्यावयाच्या बैठकीसाठी विभागीय मंडळांने आवश्यक माहितीची पीपीटी आणि शासन निर्णय-परिपत्रकांची रसदच शाळांना पुरवली आहे. तसेच १८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे शाळा प्रमुखांना विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.
लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्र संचालकांनी परीक्षाकेंद्र स्तरावर शपथ देणे, शाळा प्रमुखांनी चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहिती, संकेतांक नुतनीकरण शुल्कासह प्रस्ताव यांची पुर्तता ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत करावी. नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहितीची पुर्तता मुदतीत प्राप्त न झाल्यास परीक्षाच्यांची प्रवेशपत्रे अशा शाळांना उपलब्ध होणार नाहीत. त्याची जवाबदारी संबंधित शाळाप्रमुखांवर निश्चित होईल. त्यामुळे होणा-या विद्याथ्यांच्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शाळा प्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे.
...................
कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा स्तरावर प्रबोधन आवश्यक आहे, अन्यथा दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे अटळ आहे.
- राजेश क्षीरसागर,विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ