आता चर्चा फक्त सतेज पाटलांच्यासोबतच, काँग्रेसने डावलले तर राष्ट्रवादीची वाट वेगळी
schedule25 Dec 25 person by visibility 46 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काँग्रेस पक्षाकडे जागा वाटपाचा तीन वेळा प्रस्ताव दिला. काँग्रेसच्या समितीसोबत बैठका घेतल्या. मात्र काँग्रेसकडून केवळ झुलवत ठेवण्याचे काम सुरू आहे. समाधानकारक जागा मिळाल्या तर काँग्रेस आघाडीसोबत राहू, अन्यथा आमची वेगळ वाट असेल. शिवाय आता जागा वाटपाची चर्चा आमदार सतेज पाटील यांच्यासोबतच होईल. इतरांशी चर्चा करणार नाही. ’ असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. काँग्रेसकडून सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही वेगळे लढणार आहोत असे जिल्हा स्तरावरुन वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले आहे. गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळपर्यंत तर काँग्रेसकडून चर्चेसाठी कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे
पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, पक्ष निरीक्षक बाजीराव खाडे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, पद्मजा तिवले,रियाज कागदी आदींच्या उपस्थितीमध्ये शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. काँग्रेसकडून डावलण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादीने इच्छुकांना एक पक्षाकडून व एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत केली. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचे ठरले होते.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे पहिल्यांदा २२ जागांचा, त्यानंतर अठरा जागांचा व तिसऱ्यांदा चौदा जागांचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसच्या समितीसोबत तीन वेळा चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची एकदा चर्चा झाली. मात्र काँग्रेसकडून समाधानकारक तोडगा काढला जात नाही. केवळ चर्चा करत राहायचे, राष्ट्रवादीला झुलवत ठेवायचे असा प्रकार सुरू आहे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान महत्वाचा आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रभागातील उमेदवार निश्चित करतानाही त्यांच्याशी चर्चा झाली नाही, विश्वासात घेतले जात नाही यावरुन बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. काँग्रेसकडून जागा वाटपात योग्य स्थान राष्ट्रवादीला दिले जात नसल्याचा आक्षेपही पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. सन्मानजनक जागा दिल्या तर एकत्र, अन्यथा पर्याय खुले असा पवित्रा राष्ट्रवादीनी घेतला आहे.