करवीर पंचायत पतसंस्थेतील अपहार प्रकरणी चौघांना अटक
schedule25 Dec 25 person by visibility 74 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील २४ कोटी ६९ लाख ५३ हजार ८४९ रुपयांच्या अपहारप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. कुरुकली येथील सुमित परीट, सुयोग परीट, शुभम परीट आणि राजेंद्रनगर येथील ईर्षाद अल्लाबक्ष देसाई या चौघांना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पतसंस्थेतील अपहार प्रकरणी आणखी ३१ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. करवीर पंचायत समितीमधील अपहार प्रकरणी ठेवीदार सुबराव पवार यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सहा डिसेंबर २०२४ रोजी तक्रार दिली होती. करवीर तालुका पंचायत समितीचे अनेक कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. फिर्याद पवार व अन्य ठेवीदार हे ठेव पावतीवरील ठेव काढण्यासाठी पतसंस्थेत गेले. त्यावेळी त्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळाली नाही. त्यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी, शाखाधिकारी मयत झाला आहे. संस्थेचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे सांगत ठेवी परत करण्यावरुन उडवाउडवीची उत्तरे दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढे लेखापरीक्षणातून हा सगळा अपहार समोर आला. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे.दरम्यान या अपहाराचा वस्तुनिष्ठ अहवाल सरकारला सादर करण्याची जबाबदारी लेखापरीक्षक संभाजी देसाई, नितीन चौगले व डी. आर. पाटील यांच्याकडे सोपविली होती. मात्र त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल देण्याऐवजी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी, मानद सचिव आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन तपास अहवालात खोटी माहिती दिली याबाबतही पोलिसात तक्रार झाली होती.