Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुश्रीफांनी सत्ताधर्म पाळला ! अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर !! कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर

जाहिरात

 

मुश्रीफांनी सत्ताधर्म पाळला ! अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर !!

schedule04 Oct 26 person by visibility 119 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ‘, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भैया माने यांच्या माध्यमातून अश्वमेध यज्ञाचा घोडा मैदानात सोडला आहे, डिसेंबर महिन्यात त्यांना आमदार करणारच, कागलला आणखी एक आमदार मिळणार…’ही जाहीर विधाने आहेत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची. गेल्या पाच, सहा महिन्यात त्यांनी ही विधानांची अनेकदा पुनरावर्ती केली. आणि जेव्हा प्रत्यक्ष लढाईचे मैदान सुरू झाले, तेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच त्यांचे साथीदार भैया माने यांनी बंडाची भाषा केली. ‘माझ्या भविष्याच्या आड येऊ नका. मी नशीब आजमावयाचे ठरविले आहे. निवडणूक लढविणार’असा निर्धार बोलून दाखविला. तेव्हा मंत्री मुश्रीफ यांनी, ‘महायुतीचा धर्म पाळावा लागेल. राष्ट्रवादी महायुतीसोबत असेल. भैया माने आणि आपला संबंध संपला’असे ठणकावत सत्ताधर्म पाळला. अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला घोडा वेगळया वाटेवर निघाला.

कागलच्या राजकारणात मुश्रीफ आणि भैया माने हे गेली कित्येक वर्षे एकत्र काम करतात. राजकीय चढउतारात दोघेही कायम राहिले. निवडणूक कोणतीही असो मुश्रीफ यांच्यासोबत भैया माने असे जणू समीकरण ठरलेले. सभा असो की आंदोलन असो, निवडणुका असोत की पदाधिकारी निवडी, मुश्रीफांनी निर्णय घ्यायचा…कार्यकर्त्याना बळ द्यायचे…आणि पुढील सूत्र भैया माने, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, शशिकांत खोत अशा मंडळींनी हलवायची. मुश्रीफ यांची आमदारकीची सातवी टर्म आहे. साधारणपणे गेली दोन दशके ते मंत्रीमंडळात आहेत. कोटयवधीचा निधी मतदारसंघासाठी आणला. पायाभूत सुविधांची उपलब्धता केली. विविध योजना, विकास प्रकल्प मतदारसंघात आणत कागलचा विकास साधण्यावर भर दिला. मतदारसंघातील पकड ढिली होऊ द्यायची नाही, राजकारणाची सारी सूत्रे आपल्याच हाती राहतील हे कटाक्षाने पाहिले. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी संधी दिली. ‘सगळं काही कागलला…’अशी ओरड झाली तरी त्याची तमा न करता जिल्हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ, जिल्हा परिषद, गोकुळ अशा ठिकाणी मर्जीतील पदाधिकाऱ्यांना संधी दिली.

कागलमधील माने यांचे कुटुंब ही सामाजिक व राजकीय क्षेत्रातील. भैया माने यांच्या शैक्षणिक संस्था. राजकीय वारसा लाभलेला. कागलमधील राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी मुश्रीफांनी त्यांना कायम सोबत ठेवले. भैया माने यांनी गेल्या निवडणुकीत पदवीधरमधून लढायचे ठरविले. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या. क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. माने यांनी माघार घेतली. पाच वर्षात राजकारण बदलले. राष्ट्रवादीत फूट पडली. अरुण लाड हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. तर त्यांचे चिरंजीव शरद लाड भाजपात गेले. कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले. पदवीधर निवडणुकीचे पडघम वाजताच मंत्री मुश्रीफ यांनी भैया माने यांना आमदार करण्याची घोषणा केली. तिकीट मी आणते, मतदार नोंदणी तुम्ही करा असे आवाहन केले.

माने व कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणीत आघाडी घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाली. दरम्यान महायुतीसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला पदवीधरची जागा खेचता आली नाही. भाजपाने दावा भक्कम करत जागा मिळवली. महायुतीकडून उमेदवारी मिळणार नाही हे दिसताच भैया माने यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा केली. ‘माझे भविष्य मला अंधकारमय करायचे नाही, मला नशीब आजमावयचे आहे. ज्यांनी मतदार नोंदणी केली त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मला बंडाचे निशाण कोणत्याही स्थितीत रोवावेच लागेल.’असे म्हणत भैया माने यांनी मुश्रीफांपासून फारकत घेतली. प्रचार पत्रकावरुन त्यांचा फोटोही हटविला. दुसरीकडे मुश्रीफ यांनी माने यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. युतीधर्माची आठवण करुन दिली. मात्र माने हे माघार घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत हे स्पष्ट समजल्यावर मुश्रीफ यांनी,‘ माने यांच्या भविष्याच्या आड मी येणार नाही. ते निवडणूक लढवतील असे चित्र दिसत आहे. मात्र  आपणाला महायुती धर्म पाळावा लागेल. माने आणि आपला संबंध संपला.’अशी स्पष्ट भूमिका मांडली. कागलच्या या घडामोडीत मंत्री मुश्रीफ आणि माने यांची अनेक वर्षापासूनची राजकीय सोबत सध्या तरी संपुष्टात आला आहे. अश्वमेधचा घोडा अर्ध्यावर सोडला की वेगळया वाटेने निघाला ही चर्चा मात्र रंगली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes