खालील डड
schedule27 Nov 26 person by visibility category
प्रेस नोट
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गीते यांचा कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक व अधिष्ठातांशी संवाद
"संवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन!" कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गीते
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (MUHS) कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांनी शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२६ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. विद्यापीठाच्या 'ओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी (व्हीसी ओपीडी) या विशेष उपक्रमांतर्गत शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या सभागृहात (ऑडिटोरियम हॉल) सकाळी ११.३० वाजता या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद सत्रादरम्यान कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गीते यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम व आंतरवासिता यांसंदर्भातील विविध अडचणी व समस्या अत्यंत आपुलकीने जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याणकारी योजनांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच, महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे सर्व अध्यापक. विभाग प्रमुख आणि कर्मचारी वर्गाच्या वैद्यकीय शिक्षणासंबंधीच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर शासन आणि विद्यापीठ स्तरावरून कशा प्रकारे प्रभावी मार्ग काढता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते दृढ करणे व विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कोल्हापूर विभागीय केंद्राच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने अधिष्ठाता, प्राचार्य आणि समन्वयकांना मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गीते यांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यावर भर दिला. त्यांच्या मनोगतातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः
विभागीय केंद्र हे केवळ विद्यापीठाचे प्रशासकीय कार्यालय न राहता, ते विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा असले पाहिजे. महाविद्यालयांना आवश्यक प्रशासकीय सुविधा व मार्गदर्शन स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देणे हे विभागीय केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असावे.
विद्यापीठाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही सर्व अधिष्ठाता, प्राचार्य आणि समन्वयकांची सामूहिक जबाबदारी आहे.
महाविद्यालयांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी प्रलंबित न ठेवता, प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर जबाबदारी निश्चित करून व कालमर्यादा ठरवून त्यांचे निराकरण केले जाईल. निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जातील.
प्रत्येक महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता, संशोधन आणि विद्यार्थिकेंद्रित कार्यपद्धती यांना प्राधान्य देऊन विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य करावे.
"संवादातून समन्वय, समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून परिवर्तन!" असा संदेश देत, कुलगुरूंनी उपस्थितांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता व प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले
प्रमुख उपस्थितीः सदर कार्यक्रमास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू (ऑनलाईन) उपकुलसचिव श्री. प्रकाश पाटील, उपकुलसचिव तथा समन्वयक श्री. महेंद्र कोठावदे, सिनेट सदस्य तथा या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. बी. वाय. माळी, सहाय्यक कुलसचिव श्री. संदीप राठोड (ऑनलाईन), विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, कोल्हापूर विभागीय केंद्र समन्वयक डॉ. राजकुमार पाटील, तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिष्ठाता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर.