महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन मंत्री मुश्रीफ बोलत होते. उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम. ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया. कामाची पोहोचपावती मोठ्या मताधिक्यातून निश्चितच मिळेल. याप्रसंगी आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, भाजपचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांची भाषणे झाली.
व्यासपीठावर माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील- कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप माने, ॲड. नीता मगदूम, सतीश पाटील, कृष्णा चौगुले आदी उपस्थित होते. मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत केले. भाजपचे नाथाजी पाटील यांनी आभार मानले.
…………..
गैरसमज नसावा.......!
मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक हे दिल्लीला गेल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकले नाहीत. माजी आमदार अमल महाडिक हे सत्यजित कदम यांच्या घरातील विवाह सोहळ्यात आहेत. चंदगडचे भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील हे मुंबईत असल्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली.