महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे कोल्हापुरात निधन
schedule02 May 23 person by visibility 1017 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
महात्मा गांधी यांचे नातू, अहिंसेंचे पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक अरुण मणिलाल गांधी यांचे मंगळवारी (२ मे) कोल्हापुरात निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकार म्हणून ही त्यांनी काही काळ काम केले होते. अरुण गांधी यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली आहे. दरम्यान अरुण गांधी यांच्या पार्थिवावर वाशी येथील गांधी फाऊंडेशनच्या जागेत सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अरुण गांधी यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र. १४ एप्रिल १९३४ मध्ये डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला. सेवाग्राम आश्रमात १९४६ मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केले होते. पुढे अरुण गांधी यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केले. त्यांनी, ‘द गिफ्ट ऑफ द एंगर : अँड अदर लेसन्स फॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी” या पुस्तकाचे लेखन केले होते. १९८७ मध्ये ते अमेरिकत स्थायिक झाले. त्यांनी त्या ठिकाणी अहिंसेशी निगडीत संस्थेची स्थापना केली. दरवर्षी ते भारतात येत.
कोल्हापुरातील हणबरवाडी येथील अवनि संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. अविनचे संस्थापक अरुण चव्हाण आणि अरुण गांधी हे मित्र.अवनि संस्थेच्या कार्याविषयी त्यांना आस्था होती. अवनिच्या अनुराधा भोसले यांच्या कार्याला त्यांनी प्रोत्साहित केले होते. गांधी हे गेली दोन महिने कोल्हापुरात वास्तव्यास होते. गेले काही दिवस ते आजारी होते. मंगळवारी त्यांचे निधन झाले.