मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे दहा जानेवारीपासून गायन स्पर्धा
schedule06 Dec 24 person by visibility 105 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे दहा ते बारा जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय भावगीत, नाट्यगीत गायन स्पर्धा होणार आहे अशी माहिती मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी दिली आहे. महाराष्ट्, कर्नाटक व गोवा येथील स्पर्धकांनी या गायनस्पर्धेत सहभागी व्हावे.संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटासाठी बक्षीसे आहेत.
नवोदित व ज्येष्ठ कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. ९ ते १४ वयोगटासाठी भावगीत व नाट्यगीत स्पर्धा दहा जानेवारीला आहे. १५ ते ३५ वयोगटातील भावगीत व नाट्यगीत स्पर्धा अकरा जानेवारीला तर ३६ ते ५५ वयोगटातील भावगीत स्पर्धा बारा जानेवारी रोजी आहे.
परगावच्या स्पर्धकांसाठी व त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची निवास व्यवस्था, स्पर्धा काळात जेवणाची सोय व स्पर्धकाला एका वेळच्या साध्या एसटीचे प्रवास भाडे दिले जाणार आहे. शिवाय स्पर्धेसाठी दोन हजारांपासून दहा हजारापर्यंतची बक्षीसे आहेत. प्रत्येक गटासाठी उत्तेजनार्थ बक्षीसे, सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाईल.
या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत आठ जानेवारीपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी डॉ. शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, सतीश माळी, सुधाकर अतिग्रे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. www.neskolhapur.com या संकेतस्थळावर स्पर्धेची माहिती उपलब्ध आहे. सहा डिसेंबरपासून ऑफलाइन व ऑनलाइन फॉर्म भरता येईल असे संयोजकांनी म्हटले आहे.