अभ्यासाचा भोंगा…!
schedule12 Dec 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मोबाइलचे वाढते व्यसन आणि पुस्तकापासून दूर होत असलेली मुले…हा सर्वाधिक चिंतेचा विषय ठरला आहे. मोबाइल आणि टीव्ही पाहण्याच्या अतिरेकामुळे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. अभ्यासावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे “अभ्यासाचा भोंगा” या उपक्रम अनोखा ठरत आहे. अभ्यासाचा भोंगा या उपक्रमांतर्गत पहाटे ५ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चित वेळ दिली जाते. या वेळेत गावात सायरन (भोंगा) वाजविण्यात येतो आणि सर्व घरांमधील टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचे पालन ग्रामस्थांकडून केले जाते.
अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतील अभ्यासाचा भोंगा या उपक्रम राबविला जातो. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची नियमितता निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल होण्यास मदत होत आहेत. कोविड-१९ काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मोबाईलच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. व्यापक जनजागृतीनंतर गावकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सकाळ-सायंकाळ निश्चित दोन तास शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कुटुंबीयांमधील संवाद वाढण्यासही या उपक्रमाने हातभार लावला आहे. अग्रण धुळगाव गावातील आजी व माजी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावला आहे. गावातील प्रत्येक शिक्षकांनीही 30 ते 40 घरे वाटून घेतली आहेत. ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवितात.
गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम अग्रण धुळगाव येथे सुरू आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत सर्व गावांनी अशा सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. शैक्षणिक पर्यटन असलेले हे पहिले गाव पाहिले आहे. सर्वांनी या गावास भेट देऊन त्याची सत्यता पहावी. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, आजी व माजी सैनिक या सर्वांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. हा उपक्रम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी गावातील काही भागात घरोघरी भेट देऊन मुलांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे भेट दिली. या पाहणीदरम्यान मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्चना कापसे, सरपंच शिवदास भोसले, उपसरपंच भारती चौगुले, मुख्याध्यापक गोपाळ कनप, ग्रामविकास अधिकारी अंकुश डवणे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्हीडिओ कॉलव्दारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.