कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!
schedule12 Dec 25 person by visibility 51 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरु करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली असून, या प्रबोधिनीमध्ये ३० प्रशिक्षणार्थ्यासाठी निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली असल्याचे लेखी उत्तर क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबत विधिमंडळात उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला मंत्री कोकाटे यांनी उत्तर दिले.
‘जुलै १९९६ मध्ये राज्य सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधनीमध्ये कुस्ती व फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली. काही वर्षानंतर फुटबॉल निवासी केंद्र पुणे क्रीडा प्रबोधनी येथे स्थलांतरीत करण्यात आले. पुणे येथे फुटबॉल केंद्र स्थलांतरीत केल्यामुळे कोल्हापुरातील स्थानिक खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणाअभावी रहावे लागत आहे. देशात तिसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक वर्ग असणाऱ्या आणि हजारो खेळाडूंची नोंदणी होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींकडून हे निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत कोल्हापूर येथे सुरु करणेबाबत मागणी केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरु करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत ?’ असा अतारांकित प्रश्न आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री कोकाटे यांनी, ‘१२ फेब्रुवारी, २०२५ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय धोरण समितीच्या बैठकीमध्ये कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरु करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणार्थ्यासाठी निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुनरारंभासाठी प्रयत्न सुरु असून, आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सदर क्रीडा प्रबोधिनी कार्यान्वित करण्यात येईल,’ असे लेखी उत्तर दिले.