महापालिका शाळेत शिक्षकांची चाळीस पदे रिक्त ! उपायुक्त म्हणतात, शिक्षणाशी निगडीत विषयांची कार्यवाही महिनाभरात !!
schedule12 Dec 24 person by visibility 1528 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या मालकीच्या शहरात ५८ शाळा आहेत. विद्यार्थी संख्या दहा हजाराच्या आसपास आहे. काळाची गरज ओळखून अनेक ठिकाणी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी शिक्षक परिश्रम घेतात. शिक्षकांच्या या प्रयत्नांना प्रशासनाच्या सहकार्याची गरज आहे. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी या २८ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. त्या परत आल्यावर या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची शक्यता आहे.
महापालिका शाळेतील संचमान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे शिक्षक नियुक्तीत अडथळे येत आहेत. तर सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरता येणे महापालिका प्रशासनाला शक्य आहे. महापालिका शाळेसाठी शिक्षकांची ४१७ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या ३७७ शिक्षक कार्यरत आहेत. अजून चाळीस पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती, मुख्याध्यापकपदी पदोन्नती, बदली प्रक्रियेंतर्गत अपुरी शिक्षक संख्या असलेल्या शाळेत नियुक्ती आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता यावर प्रशासनाने फोकस करण्याची गरज आहे. महापालिकेच्या काही शाळांनी खासगी शाळांना लाजविणारी शैक्षणिक कामगिरी केली आहे. महापालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध परीक्षा आणि क्रीडा स्पर्धेतील यश हे लख्खं करणारे आहे.
या जमेच्या बाजू असताना काही शाळेत शिक्षक संख्या अपुरी आहे. वर्ग जादा आणि शिक्षक अपुरे अशी स्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होण्याची भिती आहे. महापालिका शाळेकडे अजून चाळीस शिक्षकांची गरज आहे. शिक्षकांच्या मंजूर ४१७ जागापैकी ३७७ पदे भरली आहेत. विषय शिक्षक, गणित, विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा शिल्लक आहेत. पवित्र पोर्टल अंतर्गत यापूर्वी वीस शिक्षकांच्या नेमणुका झाल्या आहेत.
…………………….
“ महापालिका शाळेत शिक्षकांची उपलब्धता करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशींल आहे. पवित्र पोर्टल अतंर्गत यापूर्वी वीसहून अधिक शिक्षकांच्या नेमणुका महापालिका शााळेत झाल्या आहेत. संचमान्यतेनंतर आणखी काही शिक्षक रुजू होऊ शकतात. नवीन शिक्षक मिळावेत यासाठी प्रशासन पाठपुरावा करत आहे. शिवाय मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. शाळा व शिक्षकांशी निगडीत साऱ्या प्रश्नांची सोडवणूक महिनाभरात करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक बदली ही आयुक्तांच्या अखत्यारित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व शिक्षकांच्या सगळया विषयांची सोडवणुकीला प्राधान्य राहील”
-साधना पाटील, उपायुक्त कोल्हापूर महापालिका