राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन
schedule14 Jul 26 person by visibility 55 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष, महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांचे मंगळवारी ( १४ जुलै २०२६) नज्धन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते. हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. कोल्हापूरच्या सार्वजनिक क्षेत्रात ते सक्रिय होते. ‘काका’म्हणून ते परिचित होते. समाजवादी ाकार्यकर्ते ही ओळख कायम राहिली. साने गुरुजींच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई.
एक ऑगस्ट १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. राष्ट्र सेवा दलात त्यांनी अनेक वर्षे काम केले कोरगावकर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम केले. राष्ट्र सेवा दलाच्या विचार कार्याचा प्रसार केला. लाटकर यांनी आयुष्यभर जनजागृतीचे कार्य केले. भारतीय संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे. तरुण पिढीत संविधानिक मूल्ये रुजावीतयासाठी शिबिरे, प्रशिक्षणवर्गाच्या आयोजनात पुढाकार असायचा. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. नुकतेच शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित शिव महोत्सवात लाटकर यांचा ‘शिव -सेवा पुरस्कार’देऊन गौरव करण्यात आला होता.
मंगळवारी, दुपारच्या समारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री आठ वाजेपर्यंत नक्षत्र पार्क, कदमवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कदमवाडी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पार्थिव ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (पंधरा जुलै) सकाळी साडे आठ वाजता कोरगांवकर हायस्कूल, सदर बाजार येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता तेथून डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल, कदमवाडी पर्यंत अंत्ययात्रा काढली जाणार आहे. त्यांनी, देहदानाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान केले जाणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचे ते वडील व माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांचे ते सासरे होतं.