पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफ
schedule13 Jul 26 person by visibility 462 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे २९ व २० जून २०२६ रोजी विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदोन्नतीसाठी राबविलेल्या प्रक्रियेत अनियमितता व गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे वैद्यकीय व सहायता शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सोमवारी, तेरा जुलै २०२६ रोजी कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विविध पदासाठी पदोन्नतीकरिता समुपदेशन प्रक्रिया झाली. दरम्यान या प्रक्रियेतंर्गत सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांनी केल्या. पदोन्नती प्रक्रियेसंबंधी यादी जाहीर केली नाही, हरकती घेतल्या नाहीत. काही शिक्षकांना समुपदेशनादिवशी पदोन्नतीसंबंधी कळविले. या प्रक्रियेवरुन शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्याशी चर्चा केली. पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होते. काही जणांनी प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली. दरम्यान जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींची गेल्या आठवडयात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक देण्यात आले. दुसरीकडे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन प्रशासनाकडून जून महिन्यात राबविलेली पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली होती. या अनुषंगाने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी, ‘पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता व गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या साऱ्या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.