Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण ! वृक्षारोपणाचा  कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रमप्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!चला टोपी घालू या, कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासारकामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधनविवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा

जाहिरात

 

एक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण !

schedule13 Jul 26 person by visibility 97 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. 'एक दिवस बळीराजासाठी' या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.


जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक भेट न देता, पालकमंत्र्यांनी थेट भातखाचरात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला. त्यानंतर हातात भाताची रोपे घेत महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या सोबतीने पारंपरिक पद्धतीने रोपलावण केली. शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला. 

रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यावेळी शेतात प्रत्यक्ष 'जीवामृत' तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जीवामृतासाठी लागणारे आवश्यक घटक, त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांसाठी होणारे फायदे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होत जीवामृत निर्मितीची सविस्तर माहिती घेतली व नैसर्गिक शेतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले.

शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी गाव परिसरातील पद्धतीने, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसूनच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या जेवणादरम्यान रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. सोमवारी ,एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
या मोहिमेत आजरा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव सहभागी झाले होते.

——

"शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेतल्यास योजनांची आखणी अधिक चांगल्या प्रकारे करता येते. याच उद्देशाने आम्ही गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. केवळ कागदावर योजना न राहता प्रशासन थेट बांधावर पोहोचल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळतो."
— प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes