शिक्षक संघ थोरात गटाचा एल्गार, दोन ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा
schedule25 Sep 23 person by visibility 816 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळांचे खासगीकरण, शिक्षकांवर अशैक्षणिक कामांची सक्ती, ऑनलाइन कामाचा भडिमार आणि प्रशासनाची दफ्तर दिरंगाई या विरोधात शिक्षक संघ थोरात गटाने एल्गार पुकारला आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महात्मा गांधी जयंतीदिनी, दोन ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल.
या मोर्चाच्या नियोजनासाठी शिक्षक संघ थोरात गटाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (२५ सप्टेंबर) कोल्हापुरात आढावा बैठक झाली. थोरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील एडके, बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष रवी पाटील म्हणाले, ‘शिक्षणाचे खासगीकरण रोखण्यासाठी आणि शाळा वाचविण्यासाठी आंदोलन पुकारले आहे शिक्षक संघाचा मोर्चा हा मुलांच्या भवितव्यासाठी आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी नाही. या आंदोलनात साऱ्यांनी सहभागी व्हावे.’
या बैठकीला शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, शिवाजीराव रोडे-पाटील, बाळकृष्ण हळदकर, नंदुकमार वाईंगडे, पद्मजा मेढे, संभाजी पाटील, धनाजी रावण, संघाचे पदाधिकारी आनंदराव जाधव, मधुकर येसणे, रावसाहेब देसाई आदी उपस्थित होते.