शहरातील सात हॉस्पिटलविषयी तक्रारी, महापालिकेने नेमले चौकशी पथक
schedule13 Sep 23 person by visibility 813 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सात हॉस्पिटलसंबंधी आरोग्य विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा रुग्णालय उपसंचालक कार्यालयाकडून महापालिकेला चौकशी करण्यासंबंधी पत्र प्राप्त झाले होते. महापालिकेने त्या सात हॉस्पिटलशी निगडीत तक्रारीसंबंधी चौकशीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. हॉस्पिटलनिहाय चौकशी पथक नेमले आहे.
शहरातील स्वस्तिक हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, सिद्धीविनायक हॉस्पिटल, साई कार्डियाक हॉस्पिटल, अॅपल हॉस्पिटल, अॅस्टर आधार हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल संबंधी तक्रारी आहेत. दरम्यान महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीत तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. पंचगंगा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी हे चौकशी पथकाचे प्रमुख आहेत. याशिवाय समितीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी व नोडल ऑफिसर (मुंबई नर्सिंग होम अॅक्ट) यांचा चौकशी समितीत सदस्य म्हणून समावेश आहे.
यासंबंधी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पावरा म्हणाले, ‘हॉस्पिटलनिहाय चौकशी पथक नियुक्त करण्यात आले आहे. पथकातील सदस्यांनी संयुक्तपणे हॉस्पिटलला भेट देऊन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करायची आहे. वस्तुस्थितीपूरक चौकशी अहवाल महापालिकेस सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत.”
दरम्यान राज्य सरकारच्या आरोग्य सेवा रुग्णालय उपसंचालक (राज्यस्तर) कार्यालयाकडे झालेल्या तक्रारी झाल्या होत्या. आरोग्य सेवा रुग्णालय उपसंचालक कार्यालयाकडून महापालिकेला प्राप्त पत्रात म्हटले आहे, ‘हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेद्वारे रुग्णांची आर्थिक लूट होत निवेदन मिळाले आहे. याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करावी.’ महापालिकेने त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे.