पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सीईओंचे सरपंचांना पत्र ! नियंत्रणासाठी प्रत्येक गावाला संपर्क अधिकारी !!
schedule12 Sep 23 person by visibility 561 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने तयारी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने व कुटुंबाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी व्हावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्रे लिहिली आहे.
जिल्हयातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहीरी अशा सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाहीत यासंबंधी दक्षता घेण्याविषयी ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. या उपक्रमाच्या सनियंत्रसाठी तालुकास्तरावरून प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. तसे जिल्हास्तरावरून या उपक्रमाचे सनियंत्रण होणार आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये २०१५ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणेत येत आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. गावामध्ये ' एक गावं, एक गणपती' या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करताना धातुच्या/ संगमरवरी/ इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करणे, तसेच 'घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करणे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी (कृत्रीम तलाव/कुंड) विसर्जन करणेबाबत गावस्तरावर प्रबोधन करणे. तसेच गावनिहाय मूर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चित करून त्याबाबत गावस्तरावर प्रसिध्दी करणे. निश्चित केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.
निर्माल्य संकलनासाठी ठिकाणांची निश्चिती, निर्माल्य जमा झालेनंतर त्याची वाहतूक व्यवस्था, घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल याबाबत सूचना केल्या आहेत. आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थीमार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी जिल्हयामध्ये एकूण ११२२ जुन्या विहीरी /खणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत तर एकूण ९७७ इतक्या पर्यायी व्यवस्थांची (काहिली,कृत्रिम तलाव, मोठी भांडी ) निर्मिती केली आहे. निर्माल्य संकलनासाठी १३२१ टॉली व १८८ घंटागाडी आहेत.धार्मिक भावना न दुखावता नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात कोल्हापूर जिल्हा हा देशात अग्रेसर राहील यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.