राज्य कला प्रदर्शनामध्ये कोल्हापूरच्या १५ कलाकारांच्या कलाकृतींची निवड
schedule05 Feb 25 person by visibility 239 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालयतर्फे राज्य ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग २०२४-२५ मध्ये कोल्हापुरमधील १५ कलाकारांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे ४ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होत आहे.
प्रदर्शनासाठी कोल्हापुरातील रेखा व रंग कला विभागामध्ये चित्रकार विजय टिपुगडे, समृद्धा पुरेकर यांची प्रत्येकी दोन तर,मंगेश शिंदे,श्यामराव राऊत,विजय उपाध्ये,राज इंचनाळकर,सुप्रिया सुतार,अभिषेक जोशी, मोहसीन मतवाल यांच्या प्रत्येकी एक कलाकृतीचा समावेश आहे. तसेच तसेच उपयोजित कला विभागामध्ये दीपक कुंभार यांची दोन,सुदर्शन वंडकर,अर्जुन पाटील यांच्या प्रत्येकी एक छायाचित्रांची तर शिल्पकला विभागामध्ये अभिजित कुंभार,रोहित बावडेकर,प्रदीप कुंभार यांच्या शिल्पाकृतीची निवड झाली आहे.
दरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनातील कलाकृतींची राज्यपालांनी पाहणी करुन कलाकारांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर सचिव बि .वेणू गोपाल रेड्डी, अभिमत विद्यापीठ कूलगुरु रजनीश कामत, कलासंचालक संतोष क्षीरसागर, निरीक्षक संदीप डोंगरे उपस्थित होते.
कला संचालक संतोष क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. कलासंचालनालयातर्फे तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना चित्रकार वासुदेव गायतोंडे कलाजीवन गौरव पुरस्कार आणि चित्रकार शकुंतला कुलकर्णी यांना कलाजीवन गौरव पुरस्कार देवून राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चित्रकार शकुंतला अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक लक्ष रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. राज्यातून ७८० कलाकृती आल्या होत्या. यातील १४८ कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. यातील १५ चित्रकारांच्या कलाकृतीना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले .याचवेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुलेखनकार अच्युत पालव यांना, त्यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे ५ ते १० फेब्रुवारी २०२५ अखेर सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.