महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च तथा सायबर ट्रस्ट या संस्थेने अत्याधुनिक ऑडिटोरियम तयार केले आहे. एकूण 800 प्रेक्षक क्षमतेचे हे बहुउद्देशीय सभागृह असून तळमजल्यावर साडेपाचशे आणि गॅलरीमध्ये अडीचशे प्रेक्षकांची व्यवस्था होऊ शकते. या दालनाचे शास्त्रोक्त पद्धतीने ध्वनी संयोजन केले आहे. तसेच प्रकाश रचना हे अद्यावत आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमाला पुरेशी आहे अशी माहिती संस्थेचे संचालक एस पी रथ यांनी दिली. आनंद भवन या बहुउद्देशीय सभागृहामध्ये मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रख्यात गायक हरिहरन यांचा कार्यक्रम होणार आहे.
जवळपास दहा कोटी रुपये खर्चून बहुउद्देशीय सभागृहची निर्मिती केली आहे. मुख्य ऑडिटोरियमला दोन्ही बाजूकडून लिफ्टची सोय आहे. त्यामुळे कलाकारांना थेट रंगमंचाकडे घेऊन जाता येते. गॅलरीमध्ये दोन मोठे डिजिटल स्क्रीन आहेत. 40 चौरस फूट इतका रंगमंचाचा आकार आहे शिवाय खालीवर सरकवत येणारे लाईटचे बिम्स बसविले आहेत. रंगमंचाचा मुख्य पडदा स्वयंचलित आहे. सभागृहाची रचना ही अतिशय आकर्षक पद्धतीने केली आहे. अत्यंत आरामशीरपणे बसून कार्यक्रम पाहता येईल अशा पद्धतीच्या खुर्ची बसविले आहे. हे बहुउद्देशीय सभागृह वातानुकूलित आहे. या ऑडिटोरियममध्ये चार मोठ्या ग्रीन रुम आहेत. यामध्ये कलाकार व सहकाऱ्यांना विश्रांती घेण्याचे कक्ष आहेत.
हे बहुउद्देशीय सभागृह फक्त शैक्षणिक उपक्रमाकरिता उपलब्ध असणार आहे. दरम्यान संगीतसूर्य केशवराव भोसले आणि त्यांच्या सांगितिक कार्याविषयी कृतज्ञता म्हणून सायबर ट्रस्टतर्फे उभारलेल्या आनंद भवनमध्ये हरिहरन यांचा कार्यक्रम होत आहे. आयोजकांनी विनंती केल्यामुळे हरिहरन यांच्या कार्यक्रमासाठी हे बहुउद्देशीय सभागृह उपलब्ध करून दिले आहे. पत्रकार परिषदेला डी एस माळी, राजेंद्र पारिजात, कार्यक्रमाचे संयोजक गिरीश महाजन, आनंद कुलकर्णी, प्रशासनाधिकारी डॉ. विनायक साळोखे, प्रा. महांतेश पाटील आदी उपस्थित होते