गुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळ
schedule19 Mar 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे कोल्हापुरातील माळकर कुटुंबीय दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. त्यानुसार गुरुवारी, सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळ बांधण्यात आली. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळोखे, माळकर कुटुंबातील निखील माळकर, सागर माळकर, शंतनू माळकर, किशोर घाटगे, कपिल नाळे आदी उपस्थित होते.
गेल्या चार पिढ्यांपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडून तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. २५ फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत माळकर कुटुंबियांच्या चौथ्या पिढीकडून अखंडपणे सुरू आहे.