हुपरीचा जिगरबाज तरुण, लष्करात बनला लेफ्टनंट
schedule14 Dec 24 person by visibility 86 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कुटुंबांतील ना कोणी सरकारी नोकरीत, ना अन्य सरकारी खात्यामध्ये उच्चपदस्थ...मग सैन्यदलातील अधिकारीपदाच्या गोष्टी तर खूप दूरवरच्या...मात्र एक जिगरबाज तरुणाला लष्करी सेवा खुणावू लागते. सैनिकी शाळेत जडणघडण होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळतो…आणि चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या तरुणाची लेफ्टनंटपदी नियुक्ती होते…करिअरसह देशसेवेसाठी सरसावलेला हा तरुण आहे, हुपरी येथील स्वरुप प्रवीण शेटे !
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एनडीए परीक्षेत तो देशात २२ व्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाला. कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल आहे. आता स्वरुपची या ठिकाणी लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. मात्र हा पल्ला तितका सोपा नव्हता. कुंटंबात यापूर्वी कोणीही सैन्य दलात नव्हतं. मग या क्षेत्रात स्वरुपने पाऊल टाकण्यापासून ते उच्चपदस्थ अधिकारींपर्यंतचा हा प्रवास सांगताना वडील प्रविण शेटे म्हणाले, ‘ स्वरुपचे प्राथमिक शिक्षण हुपरी येथील रजत इंग्लिश मिडियम येथे झाले. माध्यमिक शाळेत प्रवेश केल्यापासून आम्ही त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. त्याची तयारी सुरू होती. विशेष म्हणजे, २०११-१२ या शैक्षणिक वर्षात त्याला एकाचवेळी नवोदय विद्यालय आणि सातारा येथी सैनिकी स्कूलमधील प्रवेश निश्चित झाला. स्वरुपची पावले सैनिकी स्कूलमध्ये पडली. सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्या ठिकाणी पार पडले. बारावी शास्त्र शाखेतून तो उत्तीर्ण झाला.’
प्रवीण शेटे हे हुपरी येथील चांदी व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नी सुजाता या गृहिणी. त्यांनी काही वर्षे खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम केले आहे. या दांपत्याला स्वरुप आणि हर्ष ही दोन मुले, असं चौकोनी कुटुंब. सातारा सैनिकी स्कूलमधील वातावरण स्वरुपसाठी उपयुक्त ठरले. पुढे त्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी निवड झाली. एनडीएतील चार वर्षाचा कालावधी हा महत्वपूर्ण. येथील शिक्षण, प्रशिक्षणातून अधिकारी म्हणून जडणघडण झाली.
दरम्यान केद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल अकादमीच्या अभ्यासक्रमासाठी २१ एप्रिल २०१९ रोजी परीक्षा घेतली होती. २३ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली. मुलाखत आठ ऑगस्ट रोजी भोपाळ येथे झाली होती. अंतिमत: निकाल जाहीर झाला आणि स्वरुप हा देशात २२ व्या क्रमांकांने उत्तीर्ण झाला. या साऱ्या वाटचालीत आई-वडिलांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. शिवाय ग्रुप कॅप्टन प्रा. मनिषा मिश्रा, विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत, सचिन जोग व प्रा. विश्वास तडसरे याचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्वरुप आता आगरतळा येथे लेफ्टनंट म्हणून सेवा बजावित आहे.
…………………………
“ कुटुंबांतील कोणी सैन्यात नव्हते. सरकारी खात्यात नाहीत. मात्र या साऱ्या सीमा पार करत मुलगा स्वरुप हा देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाला. उच्चपदस्थ बनला. हे आम्हा कुटुंबांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. माझा लहान मुलगा हर्षही सध्या एनडीएत आहे.”
-प्रवीण शेटे, चांदी व्यावसायिक हुपरी