पुस्तक म्हणजे फिलॉसॉफर….जीवनातील गाईड !
schedule12 Feb 25 person by visibility 641 categoryलाइफस्टाइल

छंद माझा वेगळा-डॉ.जगन्नाथ पाटील यांचा वाचनप्रवास !!
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : वाचनाची आवड अगदी लहानपणापासूनच लागलेली. शालेय जीवनातच. साहित्य प्रकार कोणता ? हे सुद्धा कळायचं नाही. पण वाचनाची गोडी स्वस्थ बसू देत नव्हती. जे हाती मिळेल ते वाचायचं.अगदी झपाटल्यासारखं. शाळा संपली, कॉलेज झालं….नोकरीला सुरुवात झाली…पुढं नॅक सल्लागार बनलो…विविध संस्थेशी जोडलो गेलो…पण पुस्तकाशी जुळलेली मैत्री अखंडित राहिली. नव्हे दिवसेंदिवस पुस्तकबंध अधिक घट्ट होत गेले. आयुष्याच्या ज्या ज्या टप्प्यावर आव्हानात्मक स्थिती उद्भभवली…संकटांनी घेरलं…नैराश्य आलं….दु:ख झालं….त्या त्या वेळी पुस्तक हेच फिलॉसॉफर बनले…पुस्तक हेच गाईड….मित्र…सखा बनले…. वाचनानं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लाभला. पुस्तकातील पानापानातून जीवनाचा नेमका हेतू काय हे उलगडलं… माझ्या जडणघडणीत मला भेटलेल्या व्यक्ती, गुरुजनांचा योगदान वीस टक्के आणि पुस्तकांचा वाटा ८० टक्के…
हे बोल आहेत, डॉ. जगन्नाथ पाटील यांचे. डॉ. पाटील हे बेंगळुरुच्या नॅक संस्थेचे सल्लागार आहेत. जागतिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठीचे काम व विशेषतज्ज्ञ त्यांची कामगिरी जागतिक पातळीवर नावाजली गेली. ते, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मेंटार आहेत. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शाळकरी मुलगा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ज्ञापर्यंतचा हा प्रवास अचंबित करणारा. त्यांचे चंबुखडी ड्रीम्स हे पुस्तक ही वाचकप्रिय ठरले आहे. मुळात पाटील यांच्याकडे पुस्तकांचा मोठा खजाना आहे. त्यांच्या संग्रही हजारो पुस्तक आहेत. तिटवे आणि बेंगळुरु येथील निवासस्थानी वैयक्तिक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात हजारो ग्रंथ आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्याचा ठेवा आहे.
पुस्तक खरेदी करायची…वाचायची आणि आवडलेली पुस्तकं मित्रांना भेट द्यायची…हा त्यांचा जणू छंदच. वाङमयीन प्रकारातील चरित्र-आत्मचरित्र हा त्यांचे आवडते साहित्य. त्यांच्या संग्रही, थोरामोठयांची शंभरहून अधिक चरित्र-आत्मचरित्र, आत्मकथनाची पुस्तके आहेत. कवितासंग्रहांची संख्या मोठी आहे. कुसुमाग्रज, शिवाजी सावंत, सुरेश भट हे मराठीतील आवडते साहित्यिक. शिवाजी सावंत यांच्याशी तर व्यक्तीगत संबंध होते. हरिवंशराय बच्चन, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविताही विशेष आवडीच्या.
वाचनाच्या या प्रवासाला सुरुवात कधी झाली ? याप्रश्नावर आठवणींची पानं पलटत ते म्हणाले, ‘शालेय जीवनातच मला वाचनाची गोडी लागली. माझे एक मामा शिक्षक तर दुसरे पोलिस. त्यांच्याकडे नेहमी कोणतं ना कोणतं पुस्तक, नियतकालिकं असायची. माझ्या वाचनाची भूक प्रचंड. मी शिक्षणासाठी जिथं जिथं राहिलो तिथं तिथं जे जे हाती मिळेल त्याचं वाचन करी. मला आठवतयं, लहानपणीची गोष्ट. गावी तिटवे येथे सुभाष वाचनालय. तिथं पुस्तकांची संख्या मोठी. पण वाचन करायला कोणी नसायचं. मी, मात्र त्या ठिकाणी तास न तास वाचत बसे.
मराठी साहित्यासोबत इंग्रजी साहित्याचे वाचन आहे. रॉबिन शर्मा हे एक आवडते लेखक. इस्त्रायली लेखक युआल नोआह हरारी यांचे ‘सैफियंन्स ए ग्राफिक हिस्ट्री‘ हे ‘मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास’ मांडणारे पुस्तकही विशेष आवडीचं. हा लेखक इतिहास मांडताना वर्तमानाची जाणीव करुन देतो. भविष्याचा वेध घेतो. शिवाय जापनीज भाषेतील ‘इकीगाई’हे पुस्तक तर जीवनाचा हेतू काय ? तो कसा असावा, जीवन चक्रे उलगडते. त्यामध्ये अर्थनितीही आहे.
‘वाचनाला पर्याय नाही.वाचनामुळे माणसाला आपली उंची समजते, खोली कळते. जाणीव जागृती होते. माझा स्वानुभाव तर सांगतो, पुस्तक म्हणजे जीवनातील गाईड. फिलॉसॉफर आहेत. आयुष्यात ज्या ज्या वेळी नैराश्य आलं, संकट उद्भवली…समस्या उभी ठाकली…उत्तर मिळत नसे…तेव्हा तेव्हा पुस्तकांतून मला दृष्टी मिळाली. नवा दृष्टीकोन दिला. नवं ऊर्जा लाभली. नैराश्याचे सारे मळभ दूर झाले. पुस्तकांची जीवनातील स्थान वरच्या स्तरावरील आहे. यंदा, माझ्या वाढदिवसाला आम्ही साऱ्या कुटुंबीयांनी ‘एक दिवस ग्रंथालयात-पुस्तकासोबत‘ही संकल्पना राबविली. बेंगळुरुमधील 175 वर्षाची परंपरा असलेल्या हिगिनबॉटम्स पुस्तकालयाला भेट दिली. पन्नासाहून अधिक पुस्तक खरेदी केली. हा शब्दसंचय खूप मोलाचा आहे. त्याद्वारे जीवनाचे मोल कळते, जगण्याला अर्थ लाभते.’ हे पाटील यांनी नमूद केले.