महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुर्नबांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज डी पाटील यांनी दिली.
आमदार पाटील म्हणाले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर नगरीचे भूषण असून सांस्कृतिक चळवळीचे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ही वास्तू पुन्हा नव्याने उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आपल्या आमदार निधीतून दीड कोटी, खासदार शाहू महाराज आणि आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्येकी १ कोटी, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी ७५ लाख रुपये असा एकूण ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हा नियोजन समितीला पत्र दिले आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी १९१५ रोजी उभारलेला हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा नव्या दिमाखात उभा राहावा यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. मराठी चित्रपट, संगीत आणि नाट्य सृष्टीत योगदान देणारे अनेक ख्यातनाम कलाकार या नाट्यगृहातून घडले आहेत. कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.