महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "भाजप सरकारचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा धनदांडग्या लोकांसाठी आहे, त्यावर काही शेतकऱ्यांच्या बैलगाडी धावणार नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा प्रकार आहे. या महामार्गामुळे जवळपास ४० हजार एकर शेतजमीन संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध करू या. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित जोपासणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून द्या" असे आवाहन कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यात बुधवारी सिद्धनेर्ली, बाचणी, व्हनाळी शेंडूर या गावात प्रचार मेळावे झाले. या प्रचार दौऱ्यात बोलताना माजी आमदार संजय घाटगे यांनी शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला सवाल केला. "शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार टोलचे उत्पन्न जमा करणार आहे का"असा खडा सवाल त्यांनी केला. हात या चिन्हावर बटन दाबून शाहू छत्रपतींना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले,"शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकावर जमिनी महामार्गासाठी वापरणे हे कितपत संयुक्त आहे ? या शक्तिपीठ महामार्गाला विरोध राहील. महाविकास आघाडी ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम आहे. शेतीपेक्षा मोठी कोणतीही उत्पादक संस्था नाही आणि शेतकरीपेक्षा मोठा कोणी देशभक्त नाही".
दोस्ता रे दोस्ता पक्ष फोडीचा तुझा धंदा
" दोस्ता रे दोस्ता पक्ष तोडीचा तुझा धंदा-पक्ष फोडीशिवाय दुसरे काही काम केले का ? असा सवाल शाहीर सदाशिव निकम यांनी केला. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील मेळाव्यात बोलत होते. यावेळी भाषणात त्यांनी भाजप सरकारचा पोवाड्यातून समाचार घेतला. पक्ष बदलणाऱ्या नेते मंडळीवर बोलताना कुछ तुम समझो कुछ हम समझो अशी अवस्था झाली आहे." जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी म्हणाले "महाराष्ट्र हा स्वाभिमानी राज्य आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या पायावर डोके टेकवायचे नसेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना विजयी करावे. शाहू छत्रपती आणि विरोधी उमेदवाराची तुलना होऊ शकत नाही. भाजपने केलेल्या सव्हेऺतही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची उमेदवारी धोक्यात आहे असे समोर आल्यामुळेच त्यांच्या उमेदवारी जाहीर करण्याला विलंब झाला होता. शाहू छत्रपती हे सर्वसामान्यांसाठी लढणारे नेतृत्व आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारीची तुलना होऊ शकत नाही. शाहू छत्रपतींना कागल "मधून मताधिक्य देऊ.
मंडलिकांनी फोन घेतल्याचे सिद्ध करा पाच हजार रुपये बक्षीस मिळवा-अंबरिश घाटगे
बाचणी येथे झालेल्या संपर्क मेळाव्यात गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार म्हणून मंडलिकांनी पाच वर्षात गावांना भेटी दिल्या नाहीत. मतदारांशी संपर्क ठेवला नाही. त्यांनी सर्वसामान्य मतदाराचा फोन घेतल्याचे सिद्ध झाल्यास पाच हजाराचे बक्षीस देऊ."अशी खोचक टीका केली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, साताप्पा मगदूम, शिवसेनेचे संभाजी भोकरे यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, सागर कोंडेकर, आपचे संदीप देसाई आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.