कोल्हापूर उत्तरमधून महायुतीतर्फे सत्यजित कदम, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
schedule22 Oct 24 person by visibility 190 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठ्या हालचाली घडल्या. भारतीय जनता पक्षाकडून तयारी करत असलेले जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनी बुधवारी (23 ऑक्टोंबर) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. महायुतीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून कदम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे प्रबळ दावेदार समजले जात होते. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार घोषित केले होते. मात्र मुंबईत झालेल्या वरिष्ठ पातळीवरील हालचालीमध्ये त्यांची उमेदवारी मागे पडली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती अंतर्गत इच्छुकांची संख्या जास्त होती यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या नावाची चर्चा होती. भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. दरम्यान क्षीरसागर प्रमुख दावेदार समजले जात होते उत्तरची उमेदवारी आपल्याला मिळणार या भावनेतून त्याने कार्यक्रमांचा धडाका लावला होता.
दुसरीकडे सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक यांच्याही उमेदवारीसाठी हालचाली सुरू होत्या. गेले दोन दिवस जिल्ह्यातील नेते मंडळींनी मुंबईत तळ ठोकला होता. खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, खासदार महाडिकांचे पुत्र व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम हे मुंबईत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या साऱ्यांची चर्चा सुरू झाली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून कोण उमेदवार असणार या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.