जिल्हा परिषदेचा कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला,बचाव पथकाकडून शोध कार्य
schedule27 Jun 25 person by visibility 323 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे गेलेल्या कोल्हापूरचा पर्यटक रेलिंगवरुन पाय घसरुन कावळेसाद दरीत कोसळला. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे. शुक्रवारी (२७ जून २०२५) सायंकाळी ४.३० ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजेंद्र बाळासो सनगर असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सनगर हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले येथील आहेत. सध्या ते कोल्हापुरात चिले कॉलनी येथे राहतात.
शुक्रवारी सनगर हे आपल्या मित्रासोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला गेले. त्यांच्यासोबत चौदा मित्र होते. दुपारनंतर कावळेसाद पॉईंट बघण्यासाठी गेले. यावेळी रेलिंगवरुन त्यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले. त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी व इतर नागरिकांनी आरडाओरड केला. मदतीसाठी प्रयत्न केले. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाचे कर्मचारी पोहोचले. शोध मोहिमेला सुरुवात केली. मात्र सायंकाळी सहानंतर दाट धुके, अंधार यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याने शोध मोहिम थांबवली. शनिवारी, सकाळी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पथकाने सांगितले.
सनगर हे जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागात ज्युनिअर क्लार्क आहेत. त्यांची आठ ते दहा दिवसापूर्वीच करवीर पंचायत समिती येथे बदली झाली आहे. ते, आपल्या मित्रासोबत व जिल्हा परिषदेतील सात ते आठ कर्मचाऱ्यासोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला गेले होते. कावळेसाद पाँईटजवळ शुक्रवारी सायंकाळी सनगर हे पाय घसरुन दरीत कोसळले.