इचलकरंजीमध्ये फेब्रुवारीत दोन दिवसीय ग्रंथोत्सव- जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर
schedule22 Jan 25 person by visibility 40 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयतर्फे सहा व सात फेब्रुवारी २०२५ या कालावधीत इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित केला आहे. राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, थोरात चौक, इचलकरंजी येथे हा महोत्सव होणार आहे. ग्रंथोत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, ग्रंथालयांशी संबंधित विकसीत केलेल्या सॉफ्टवेअर कंपन्या, फर्निचर विक्रेते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव 2024 जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी केले आहे.
या ग्रंथोत्सवात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथोत्सवासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, जिल्ह्यातील मंत्री, सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनेक मान्यवर पदाधिकारी, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, इचलकरंजी शहरातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सव कालावधीत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल तसेच ग्रंथालयांशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्या, ग्रंथालयाशी संबंधित फर्निचर विक्रेते यांचेही स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्टॉल लावण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, आकाशगंगा अपार्टमेंट समोर, राजारामपूरी अकावी वी गल्ली, कोल्हापूर येथे लेखी पत्रासह २८ जानेवारी २०२५ पर्यंत संपर्क साधावा, असेही श्रीमती वाईकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.