प्राचार्य जी. पी माळी यांच्या ‘सुवर्णगंध’मधील व्यक्तीचित्रांनी समाजजीवन सुगंधित - कुलसचिव व्ही. एन. शिंदे
schedule22 Jan 25 person by visibility 124 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं अशी व्यक्तिमत्वे समाजात कमी आहेत. अशा काळात समाजातील चांगुलपणा शोधत, व्यक्तिचित्रे रेखाटणे ही बाब उमेद वाढविणारी आहे. प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या ‘सुवर्णगंध’ पुस्तकातून वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्तिचित्रांचा उलगडणारा प्रवास हा समाजमनाचेही जीवन सुगंधित करतो.’असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी काढले.
प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या ‘सुवर्णगंध’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला. कुलसचिव शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी नियंत्रक बी. एम. हिर्डेकर हे प्रमुख वक्ते होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपसचिव सतीश भारतीय, सांगलीचे अॅड. अजित सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षिण महाराष्ट् शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील (बेळगाव) हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.अक्षर दालन येथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.
प्रमुख वक्ते डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘ वाचन-लिखाणातून माणूस शहाणा होण्याची प्रक्रिया असते. व्यक्तिचित्रे, चरित्रे, आत्मचरित्राच्या माध्यमातून समाजाला वेगळी दृष्टी लाभते. साहित्यकृतीतून् विविध व्यक्तिमत्वे उलगडत असतात. प्राचार्य माळी म्हणजे माणसे जोडणारा माणूस. त्यांनी ‘सुवर्णगंध’मधून समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व रेखाटली. त्यांनी मांडणी करताना बाह्यरुपाला महत्व न देता अंतरंगात डोकावत व्यक्तिचित्रण खुलविले आहे. ’
राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपसचिव सतीश भारतीय म्हणाले, ‘समाजाला सदविचारांनी गंधित करणारी ही साहित्यकृती आहे. समाजाच्या भल्यसाठी काही करू ईच्छिणाऱ्या मंडळीसाठी ‘सुवर्णगंध’ हे पुस्तक प्रेरणादायी आहे. त्यांच्या लिखाणाला एक प्रकारचा सुगंध आहे. हा लेखन प्रवास यापुढेही दरवळत राहावा.’ लेखक डॉ. माळी यांनी मनोगतादरम्यान लेखन प्रवास, विविध टप्प्यावरील अनुभव सांगितले. ‘आपले हे बारावे पुस्तक आहे. पुस्तकात न मावणारी माणसं मी शब्दबद्ध केली आहेत.’असे त्यांनी नमूद केले. प्राचार्य प्रविण चौगुले यांनी प्रास्ताविक केले. निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशक अमेय जोशी यांनी आभार मानले.