जनतेच्या मनातला पालकमंत्री मीच, मुश्रीफांचा आबिटकरांच्यावर कुरघोडीचा प्रकार!!
schedule20 Jan 25 person by visibility 405 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सारे काही आलबेल नाही याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार व राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच असे विधान करत कुरघोडीचा प्रकार केला आहे. मुश्रीफ हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर राधानगरीचे आमदार आबिटकर यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या साऱ्या घडामोडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगल्याची चर्चा असतानाच मुश्रीफ यांच्या नव्या विधानाने नव्या चर्चेला तोंड फुटले.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे मी मंत्रीपदावर आहे. त्यापैकी केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे विधान त्यांनी केले. ज्येष्ठत्वानुसार तुम्हाला कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळायला हवे होते. वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. व्यक्तीश: तुम्ही समाधानी आहात काय ? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे श्रद्धा -सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा आहे. याबाबतच्या माझ्या भावना मी आमचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी अशा घटना घडत असतात. अशावेळी संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढणे गरजेचे असते. पक्षीय नेतृत्वाकडे नेमक्या काय भावना व्यक्त केल्या? असे विचारताच श्री. मुश्रीफ म्हणाले, ते काय तुम्हाला आज सांगण्यासारखे नाही.
पालकमंत्री पदांच्या विषयांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या गावी आलेले आहेत. महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे काय? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरून मी आज सकाळीच आलेलो आहे. त्यामुळे काय घडलं आहे हे मला माहीत नाही. उपमुख्यमंत्री शिंदे सातत्याने शेतीचा छंद आणि आवडीच्या निमित्ताने आपल्या गावी येतात. मुख्यमंत्रीही दावोसला गेल्यामुळे कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठका होणार नाहीत म्हणून ते गावी आले असतील.
सहपालकमंत्री हा नवीनच प्रकार सुरू झाल्याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, सह पालकमंत्री ही गोष्ट नवीन आहे हे खरे आहे. यापूर्वी त्याच जिल्ह्यात एखादा दुसरा मंत्री असेल तर तो सह पालकमंत्री असायचा. मी मुंबईला परत गेल्यानंतर हा सह पालकमंत्री विषय काय आहे, हे नक्की समजून घेईन. साताऱ्यात शिंदे गटाचे दोनच आमदार असताना शंभूराजे देसाई यांना पालकमंत्री पद दिले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, एकूणच पालकमंत्री पदांच्या वाटपाचे तत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवलेले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर होऊन त्या नावाची पुन्हा माघार घ्यावी लागली. हे त्यांचे खच्चीकरण म्हणता येईल काय? तसेच; नाशिकच्या नावालाही स्थगिती मिळाली. याबद्दल विचारले असता म्हणाले, जे तत्व ठरले आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे. तत्त्व बिघडल की अशा घटना होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून परत आल्यानंतर हा सगळा प्रश्न मिटेल.
पहाटेच्या शपथविधीला अजितदादांनी जाऊ नये, यासाठी आपण आग्रह धरल्याचे धनंजय मुंडे यांनी भाषणात सांगितले. याबद्दल विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, श्री. मुंडे हे असे वक्तव्य करीत असताना मी व्यासपीठावरच होतो. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नये म्हणून त्यांनी अजित पवारांना अडविले हे मी पहिल्यांदाच ऐकले. यापूर्वी मी त्यांच्या तोंडून तसे कधीही ऐकलेले नाही.
पालकमंत्रीपदाच्या गोंधळावरून महायुतीमध्ये आता फक्त खून करणे बाकी राहिले आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मुश्रीफ म्हणाले, संजय राऊत यांच्या या वक्तव्यात काहीही तथ्य नाही. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी मत- मतांतरे असतात. असे विषय होत असतात. बदलापूरप्रश्नी पोलिसांनी अनावश्यक बळाचा वापर ठेवल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गृहखाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेे आहे. त्या विषयाची ते योग्य ती दखल घेतील.