गोकुळच्या एमडींचे दुग्ध व्यवसायावर संशोधन, पुणे विद्यापीठाकडून पीएचडी
schedule22 Jan 25 person by visibility 33 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएचडी संपादन केली. त्यांनी, ‘अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे सामाजिक आणि आर्थिक अध्ययन (२००८-२०१८)’ याविषयावर शोधनिबंध सादर केला होता.
गोडबोले यांनी आपल्या शोधनिंबधातून ‘दुग्ध व्यवसायातील उत्पादकांच्या आर्थिक स्थिती, सामाजिक स्तर, व शाश्वत विकास यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या या संशोधनाने दुग्ध व्यवसायातील उत्पादनक्षमतेत सुधारणा व दूध उत्पादकांच्या जीवनमान उन्नतीसाठी मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूग्ध उत्पादकांना अधिक चांगल्या धोरणांचा लाभ देण्यासाठी संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी केल्याचा मला आनंद आहे. या प्रवासात मार्गदर्शक डॉ. माधव एच. शिंदे यांचे मार्गदर्शन मला लाभले. तसेच आर. बी. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर,( जि. अहिल्यानगर) येथील उत्कृष्ट संशोधन सुविधांचा उपयोग मला झाला. गोकुळ संघातील योजनांच्या आणि सुविधांच्या अभ्यासामुळे, मी अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूग्ध उत्पादकांसाठी धोरणात्मक शिफारसी सुचवू शकलो. ज्या त्यांच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा, शाश्वत आर्थिक विकास आणि जीवनमान उन्नतीसाठी उपयुक्त ठरू शकतील.’असे गोडबोले यांनी म्हटले आहे. भविष्यात दूग्ध व्यवसाय आणि आर्थिक विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास मी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.