स्टेट बँक अधिकाऱ्यांच्यामध्ये रंगले क्रिकेटचे सामने
schedule20 Jan 25 person by visibility 280 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर क्षेत्रीय अधिकारी संघटनेतर्फे कोल्हापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर येथे यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूर व सांगली या कार्यक्षेत्रातील सत्तरपेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता व सोलापूर विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक निशांत जयस्वाल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बँकेच्या अधिकारी संघटनेचे राजेंद्र सपकाळे, संघटनेचे खजिनदार विशाल शिंदे उपस्थित होते.
उत्कृष्ट संघभावना व खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन तसेच अधिकाऱ्यांमधील एकोप्याची भावना वाढवण्याच्या उद्देशाने या स्पर्धा गरजेच्या आहेत असे मत यावेळी क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता यांनी व्यक्त केले.
स्टेट बँक अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर युनिट कडून अशा प्रकारच्या क्रीडा उपक्रमांद्वारे सुदृढ व सुसंवादात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे राजेंद्र सपकाळे यांनी नमूद केले.
यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून सहा संघांनी भाग घेतला . साखळी सामन्यातील सहा सामन्यानंतर रंगलेल्या अंतिम सामन्यात 'रायगड योधा' या संघाने विजय मिळवून चषकावर नाव कोरले. विजयी संघाचे नेतृत्व कवठे महांकाळ शाखेचे व्यवस्थापक मयूर यलमली यांनी केले.स्पर्धेचे संयोजन अधिकारी संघटनेचे क्षेत्रीय सचिव सूर्यकांत माळी, उपसचिव योगेश पुरेकर, मारुती चव्हाण व संयोजन समितीने केले.