शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, प्राचार्य जो. म. साळुंखे यांचे निधन
schedule22 Jan 25 person by visibility 154 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य व राजर्षि शाहू विद्यानिकेतन शिंगणापूरचे माजी प्राचार्य जोतिराव मशनूराव तथा जो. म. साळुंखे यांचे बुधवारी (२२ जानेवारी २०२५) निधन झाले. इचलकरंजी येथे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षणक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला अशा शब्दांत हळहळ व्यक्त होत आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळासह अन्य अनेक शिक्षण संस्थांचे ते मार्गदर्शक होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्राचार्य साळुंखे राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर हे नाव कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात सिंहाचा वाटा असणारं एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी वेगवेगळ्या नामांकित ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केले. प्राचार्य साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने असंख्य विद्यार्थी घडले. प्रशासकीय, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीयसह विविध क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, जागतिक शिक्षणतज्ञ आणि नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, आयपीएस दिगंबर प्रधान, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी विभागीय आयुक्त विलास पाटील, डॉ. बबन पाटील, डॉ. कुर्ले, डॉ. वाघ डॉ .अरुण पाटील, डॉ.धनंजय गिरमल यांसारखे नामांकित वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीसह सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहेत. अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही त्यांचे खूप मोठं योगदान आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (23 जानेवारी ) रोजी इचलकरंजी स्मशानभूमी येथे आहे.