प्राध्यापकांच्या विविध मागण्यासाठी बारा टप्प्यात आंदोलन
schedule10 Jun 22 person by visibility 999 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ७१ दिवसाचे थकीत वेतनसह प्राध्यापकांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे (एमफुक्टो) बारा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा (सुटा) सहभाग आहे. एमफुक्टोने घेतलेल्या निर्णयानुसार सुटातर्फे आंदोलन होईल. यामध्ये प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी.एन.पाटील, खजिनदार डॉ. अरुण शिंदे व कोल्हापूर जिहाध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
सुटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांची तपशीलवार मांडणी करत आंदोलनाचे टप्पे सांगितले. पंधरा जून ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आंदोलने होणार आहेत. पहिल्यांदा लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेउन मागण्यांची वस्तुस्थिती मांडली जाईल. १५ ते २० जून या कालावधीत ई मेल संदेश आंदोलन असेल.
एक जुलै ते १५ जुलै दरम्यान जिल्हा मेळावे होतील. विद्यापीठस्तरीय मेळाव्याचे आयोजन आहे. १६ जुलैला काळया फिती लावून कामकाज, १८ जुलै रोजी उच्च शिक्षण विभाग पुणे संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा, एक ऑगस्ट रोजी सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा व कुलगुरुंना निवेदन असे आंदोलनाचे टप्पे आहेत. ’पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. वैशाली सारंग उपस्थित होत्या.