अलमट्टीसंदर्भात पंधरा दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक-जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील
schedule21 May 25 person by visibility 159 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अरुण लाड, इद्रिस नायकवडी, डॉ. विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व उल्हास पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले उपस्थित होते.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ८० ते ८५ टीएमसी पुराचे पाणी वळविले जाईल. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यात येणार असल्याने पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचेही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
………….
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या सूचना
अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात संघर्ष समिती लढा देत आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत संघर्ष समितीचे आर. जी. तांबे, बाबासाहेब देवकर, भारत पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पाटील दिपक पाटील आदीं सहभागी होत्या. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा कायमस्वरुपी धोका निर्माण होऊ शकतो हे त्यांनी निदर्शनास आणले.