कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा षंढ नाही ! सतेज पाटलांना चॅलेंज
schedule21 Nov 24 person by visibility 558 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मतदानादिवशी महायुतीला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधक सैरभर झाले होते. पराभव होणार हे स्पष्टपणे दिसू लागल्याने विरोधकांनी मतदानादिवशी दुसरीकडे लक्ष विचलित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माझ्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. मात्र त्यांना सांगतो, कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा काही षंढ नाही." असा सज्जड दम कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये निशाणा साधला. टाकाळा येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. काही गुंड त्या ठिकाणी हातात दांडके घेऊन होते. मात्र आम्हाला ही निवडणूक अतिशय शांततेने हाताळायची होती. विकासाच्या मुद्द्यावर आमचा भर होता. यामुळे कुठेही संयम ढळू दिला नाही. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कसबा बावडा येथे जो प्रकार घडला, ते दोघंही शिवसेेेेेनेचे कार्यकर्ते. राहुल माळी आता ठाकरे गटात आहेत. त्यांनी , कसबा बावडा येथील आमचे पदाधिकारी सुनील जाधव यांना उद्देशून काही बोलले. यावरून झटापटीचा प्रकार घडला. यानंतर दोघांनाही शांत राहण्याची आवाहन केले. विषयावर पडदा टाकला होता. मग अचानक जमाव एकत्र येतो आणि घोषणाबाजी सुरू होते हा काय प्रकार होता ? असा सवाल करून क्षीरसागर म्हणाले, " पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर आम्ही राजकारण करत नाही. समाजकारण हा आमचा आधार आहे. सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री असताना कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये दोन-तीन मर्डरी झाल्या. आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आणि शिकवण आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे आमचे सूत्र आहे. प्रत्यक्ष मतदानादिवशी माझ्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा जो प्रकार घडला या साऱ्या घटनेची निवडणूक आयोग, राज्याचा गृह विभाग आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार सतेज पाटील हे हिशेब चुकता करु अशी भाषा करतात हा अतिशय गंभीर प्रकार आहे. मुळात या निवडणुकीत विरोधक पहिल्यापासून चुकीचे वागले. उमेदवारी निवडीत त्यांनी घोळ घातला, त्यात आमचा काही दोष नाही. निवडणुकीच्या काळात त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. बदनामीचा प्रकार केला मात्र हा सारा प्रकार लोकांना रुचला नाही. ज्यांना जनमानसात स्थान नाही अशांनी पेन ड्राईव्ह, व्हिडिओचा वापर केला मात्र लोकांनाही तो प्रकार आवडला नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी त्यांनी टीकेचे राजकारण केले. या निवडणुुकीमध्ये वारं आमच्या बाजूने होते. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. आमदार सतेज पाटील यांच्या बुद्धीची कीव वाटते. त्यांनी रस्ते कामाची वर्क ऑर्डर आणि महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या जीआर संदर्भात प्रश्न उपस्थित करतात. ते आमदार, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री होते. या कालावधीत त्यांनी शहरासाठी शाश्वत स्वरूपात काय केले ? याउलट गेल्या अडीच वर्षांमध्ये कोल्हापूर शहरासाठी आम्ही किती योजना राबवल्या यासंबंधी जाहीर चर्चा करायला मी आजही तयार आहे." असे आव्हान क्षीरसागर यांनी पुन्हा दिले. निवडणुकीच्या कालावधीतील जे जेे चुकीच्या पद्धतीने त्या साऱ्यांचा कायदा हिशेब करेल. आमचा कायद्यावर विश्वास आहे.
क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात आणि जिल्ह्यात भरीव काम केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला. लाडक्या बहिणींनी मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद दिला आहे. यामुळे पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दहा जागा जिंकून येतील. कोल्हापूर उत्तरमधून आपण निवडून येणार. शिवसेना, भाजप राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्ष व इतर मित्र पक्षांनी जी मदत केली या साऱ्यांचै मी आभार मानतो. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वच भागातून मला मोठा प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधकांच्या बूथवर कार्यकर्ते नव्हते. " असेही क्षीरसागर म्हणाले.
पत्रकार परिषदेला विद्यमान आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे शिवाजी जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, राहुल चव्हाण, शिवसेनेचे सुनील जाधव, तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते.