कागल, करवीर, राधानगरीत चुरशीने मतदान ! जिल्ह्यात सायंकाळ सहानंतरही २०० केंद्रावर मतदारांच्या रांगा !!
schedule20 Nov 24 person by visibility 246 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा, पक्ष व गटातटाच्या राजकारणातील इर्षा, अधिकाधिक मतदान आपल्याच उमेदवाराला होण्यासाठी समर्थक-कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ, नेते व उमेदवारांनी मतदारसंघातील विविध भागांना भेटी अशा वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७. ९७ टक्के मतदान झाले. सायंकाळी सहानंतर २०० मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.
‘कोल्हापूर जिल्हा यंदाच्या निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर आहे. रात्री दहा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिसहाय मतदानाची टक्केवारी उपलब्ध होईल’असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांमधील शाब्दिक बाचाबाची, पैसे वाटल्याचे आरोप यामुळे काही ठिकाणी तणावाचे प्रसंग उद्भवले. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात मतदान यंत्रात बिघाडीचा प्रकार घडला. कसबा बावडा येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. सायंकाळी सदरबाजार येथेही कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली.
जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, शाहूवाडी, इचलकरंजी या ठिकाणी दुरंगी लढत झाली. हातकणंगले, शिरोळ, राधानगरीमध्ये तिरंगी तर चंदगडमध्ये पंचरंगी लढत आहे. गेले पंधरा दिवस प्रचाराचे रान उठविणाऱ्या पक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांतील चुरस प्रत्यक्ष मतदानादिवशी पहायला मिळाले. ३४५२ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक मतदारसंघात मतदारांचा उत्साह होता. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत- कोल्हापूर उत्तर ५९.७४ टक्के, कोल्हापूर दक्षिण ६८.७२ टक्के, कागल ७४.३३ टक्के, करवीर ७२.१८ टक्के, राधानगरी ७२.८३ टक्के, चंदगड ६८.५८ टक्के, हातकणंगले ६५.१० टक्के, शिरोळ ६८.४९ टक्के, इचलकरंजी ५७.८३ टक्के आणि शाहूवाडीत ७०.४० टक्के टक्के मतदान झाले.
...........................
दहा मतदारसंघात कोण मारणार बाजी….
कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर. कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार अमल महाडिक. राधानगरीत महायुतीचे आमदार प्रकाश आबिटकर, महाविकास आघाडीचे माजी आमदार के. पी. पाटील तर अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे. हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे, महायुतीचे अशोक माने आणि तिसऱ्या आघाडीचे माजी आमदार सुजित मिणचेकर. शाहूवाडीत जनसुराज्य शक्तीपक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील. चंदगडमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार राजेश पाटील, महाविकास आघाडीच्या नंदिनी बाभूळकर, जनसुराज्य शक्तीचे मानसिंग खोराटे,भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अप्पी पाटील. शिरोळमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील, तिसऱ्या आघाडीचे माजी आमदार उल्हास पाटील. करवीरमध्ये महायुतीचे माजी आमदार चंद्रदीप नरके व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील लढत आहे. इचलकरंजीत महायुतीचे राहुल आवाडे विरुद्ध महाविकास आघाडीचे मदन कारंडे.