जिल्ह्यातील ३३ लाख मतदारासाठी मतदान केंद्रे सज्ज, शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule19 Nov 24 person by visibility 58 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात एकूण ३३ लाख पाच हजार ९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी ३४५२ मतदान केंद्र सज्ज आहेत. यातील १४३ ठिकाणी आदर्श मतदान केंद्र व स्थानिक विषयांवर आधारित मतदान केंद्र उभारली आहेत.
जिल्हयात मतदारांनी मतदान करावे त्यांना मतदान एक उत्सव वाटावा यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना आवश्यक किमान सुविधा यात पुरेशी सावली, रांगांसाठी चांगल्या सुविधा, पाणी, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याची मतदान टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १०० टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील तीन हजार ४५२ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. लोकशाही बळकटीकरण्यासाठी एक एक मत महत्वाचे आहे, हा सुट्टीचा दिवस नसून लोकशाहीने दिलेले कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी मतदान करुन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असेही ते म्हणाले.