कसबा बावडा, सदरबझारमध्ये कार्यकर्ते आमनेसामने, घोषणाबाजीने तणावाची स्थिती
schedule20 Nov 24 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मतदानादिवशी कसबा बावडा आणि सदरबझार येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे समर्थक आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी, अंगावर धावून जाण्याचा प्रकार यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना हटविले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्यामध्ये लढत होती. दोन्ही बाजूनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कसबा बावडा येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे व शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यावरुन वाद उफाळला. एकमेकांना आव्हान देण्याची भाषा वापरली. भगवा चौकात कार्यकर्ते एकवटले. दरम्यान काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे भगवा चौकात दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची सूचना कली. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी शांत राहण्याचे आवाहन केले.
सायंकाळी सदरबझार येथे क्षीरसागर आणि लाटकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळला. कोरगावकर हायस्कूल येथील मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी काठया उगारत जमावला पांगविले. दरम्यान सकाळी शिवाजी पार्क येथील विक्रम हायस्कूल येथील मतदान केंद्र येथे मतदान यंत्रात बिघाड झाली. असाच प्रकार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेहरुनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र येथे घडला. यामुळे काही वेळ मतदान प्रक्रिया बंद ठेवली होती.