विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा आवाज वाढला ! शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा !!
schedule09 Jul 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पाचा सरकारने निर्णय काढला, पण आर्थिक तरतूद केली नाही. तेव्हा आर्थिक तरतूद याच अधिवेशनात करावी या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघातर्फे आंदोलन सुरू आहे.समन्वय संघांतर्फे आठ व नऊ जुलै २०२५ रोजी शाळा बंदची हाक दिली होती. त्यानुसार राज्यातील जवळपास पाच हजारहून जास्त शाळा बंद ठेवून मंगळवारी जवळपास पंचवीस हजार शिक्षकांनी आझाद मैदान गाठले होते.मंगळवारी निर्णय न झाल्याने आमदार रोहित पवार यांच्या सह हजारो शिक्षकांनी अख्खी रात्र आझाद मैदानावर जागून काढली. तर बुधवारी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी आझाद मैदानावर पोहोचले.
दरम्यान आंदोलनाची तीव्रता पाहून मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांची बुधवारी भेट घालून देतो. रात्री मैदानात थांबू नका असे आवान केले. मात्र मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्धार शिक्षकांनी केला होता. यामध्ये शेकडो महिला देखील रात्रभर आझाद मैदानात होत्या. बुधवारी आंदोलनाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार, सेतज पाटील, ,भास्कर जाधव,विश्वजित कदम,अब्दुल सत्तार,अरविंद सावंत,विनय कोरे, भाई जगताप अरविंद सावंत, अशोकराव माने, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्यक्रम राहील असे सांगितले. तसेच शिक्षकांना मैदानावर, चिखलात आंदोलन करायला लागणे हे योग्य नाही असे स्पष्ट केले. शिक्षकांच्या सोबत असल्याची ग्वाही नेते मंडळींनी दिली. कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी शिक्षकांच्या मागण्या मांडल्या.
...................
“ आझाद मैदानात राज्यभरातील शिक्षक आंदोलन करत आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर ९ महिने लोटले, तरी सरकार शिक्षकांचे पैसे का देत नाही? एकीकडे सरकार अनावश्यक पॉवर शिटसाठी १८ हजार कोटींचा निधी देते, राज्यातील ५० हजार कोटींच्या पुरवठ्याची मागणी आहे, १५ हजार कोटी शहरी विकासासाठी ठेवले आहेत, पण सरकारकडे शिक्षकांना देण्यासाठी ११०० कोटींचा निधी नाही का? शिक्षकांच्या चर्चेसाठी सरकारकडून कोणीतरी येण्याची प्रतीक्षा करत आहे. नेमका तुम्ही या आंदोलकांशी कधी चर्चा करणार? ”
-सतेज पाटील, काँग्रेस गटनेते विधान परिषद