सिटी इंजिनीअरच्या नियुक्तीत मंत्र्यांचा हस्तक्षेप ! नगरविकासचे महापालिकेला पत्र !!
schedule09 Jul 25 person by visibility 192 categoryक्रीडामहानगरपालिका
शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार रमेश मस्कर यांच्याकडे, जलअभियंतापदी हर्षजीत घाटगे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार रमेश मस्कर यांच्याकडे सोपविला आहे. तर शहर अभियंतापदाचा कार्यभार सांभाळणारे हर्षजित घाटगे यांच्याकडे जल अभियंतापदाचा कार्यभार पुन्हा सोपविला आहे. नेत्रदीप सरनोबत हे ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे जवळपास दोन दशके यापदाचा कार्यभार होता. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्ती होऊन महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोपर्यंत त्यांच्याकडील या पदाचा कार्यभार जल अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे सोपविला. तर मस्कर यांच्याकडील जल अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार घाटगे यांच्याकडे सोपविला. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी हा आदेश काढला आहे. मात्र यामध्ये राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांचा महापालिकेशी पत्रव्यवहार झाला.
इतक्या जलदगतीने या पदावरील बदली व नियुक्तीचा खेळ झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. घाटगे हे कार्यकारी अभियंता आहेत. तर मस्कर हे उपशहर अभियंता आहेत. पदाच्या श्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता हे पद उच्च श्रेणीतील मानले जाते. दरम्यान शहर अभियंता हे पद शासनमान्य आहे. यामुळे या बदली प्रकरणात सरकारच्या नगरविकासचा आदेश हा अंतिम मानला जातो.
मुळात महापालिकेत शहर अभियंता हे पद महत्वाचे मानले जाते. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यापेक्षा शहर अभियंता कोण ? हा विषय सर्वाधिक चर्चेचा असतो. सगळया कामांना मान्यता ते मंजुरीपर्यंतची कामे शहर अभियंता कार्यालयाशी निगडीत असल्यामुळे त्या पदाचे मोल मोठे. यामुळे या पदाचा मोह अनेकांना सुटत नाही, हे अनेकदा दिसून आले. शहर अभियंतापदावर वर्णी लागावी म्हणून फिल्डींग लावली जाते. केवळ महिनाभरात सिटी इंजिनीअरपदावर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रकार घडला. ३१ मे रोजी नेत्रदीप सरनोबत सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील सिटी इंजिनीअर कोण ? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हर्षजीत घाटगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. त्यांच्यकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे त्यांच्याकडील जल अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार मस्कर यांच्याकडे सोपविला.मस्कर हे नगररचना विभागात उपभियंता म्हणून कार्यरत आहेत.
बुधवारी शहर अभियंता व जल अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत नव्याने आदेश निघाला. नगरविकास विभागाचे पत्र महापालिकेला मिळाले. त्यापूर्वी शहर अभियंतापदावर कोणाची वर्णी लागावी यासंबंधी जिल्ह्यातील एका मंत्र्यांनी सरकारकडे पत्र दिल्याचे वृत्त आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता, नियुक्तीचे निकष यासंबंधी माहिती घेतली. त्यानंतर नगरविकास विभागाकडून नवीन आदेश निघाला. प्रशासनात बदली हा नियमित भाग असला तरी या प्रकारात जिल्ह्यातील एका मंत्र्यांनीच हस्तक्षेप केल्याच्या वृत्ताने शहर अभियंता पदावरील बदली आणि नवी नियुक्ती चर्चेची ठरत आहे.