नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकांच्या आदेशाला केराची टोपली- कोल्हापूर नेक्स्टचा आरोप
schedule08 Jul 25 person by visibility 30 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत कोल्हापूर नेक्स्ट गेले वर्षभर सातत्याने आवाज उठवत आहे. महानगरपालिकेतील काही अधिकारी, आपल्या जबाबदारीकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने मात्र आमच्या सर्वच मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यात प्रामुख्याने शहरात वाढत चाललेल्या बेकायदा-विनापरवाना बांधकामांवरील कारवाईचा विषय होता. याविषयी प्रशासकांनी आदेश देऊनही अधिकारी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.असा आरोप कोल्हापूर नेक्स्टतर्फे करण्यात आला.
कोल्हापूर नेक्स्टचे चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उलपे, शेफाली मेहता, यशवंत माने, ओंकार गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘शहरातील नागरी सुविधांच्या सोडवणुकीसोबत नागरीकांच्या बैठका कराव्यात अशी मागणी प्रशासकांकडे केली होती. त्या प्रमाणे प्रशासकांनी लेखी आदेशही दिले होते. परंतु काही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत खाते प्रमुखांनी बैठका घेतल्या. काही समस्यांबाबत अधिकाऱ्यांना उपाययोजनाही सुचविल्या होत्या. झालेल्या बैठकांपैकी पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग यांनी आम्ही दिलेल्या समस्यांपैकी काही समस्यांवर उपाययोजना केली.
परंतु नगररचना विभागाकडून काही कार्यवाही होताना दिसत नाही. सामान्य माणसांना छोट्या परवानग्यांसाठी महिनोंन्महिने हेलपाटे घालायला लावणारे अधिकारी शहरातील काही चुकीचे, नियमबाह्य काम करणार्या बांधकाम व्यावसायीकांसोर अक्षरश: लोटांगण घालतात ही परिस्थिती आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करीत नाही आहेत. तेव्हा महानगरपालिका प्रशासक, अतिरीक्त आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना विभाग आणि प्रत्यक्ष नगररचना विभागात कार्यरत असणारे सर्व अधिकारी यांना इशारा देत आहोत की येत्या एक आठवड्यात कोल्हापूर नेक्स्टच्या मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास पुढील आठवड्यात नगररचना कार्यालयामध्ये आंदोलन करू. त्याचबरोबर नियमबाह्य वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असे म्हटले आहे.