शिवाजी विद्यापीठातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तकाची निर्मिती ! कुलगुरू शिर्केसह तीन संख्याशास्त्रज्ञांनी केले लेखन !!
schedule08 Jul 25 person by visibility 79 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी तीन महत्त्वाच्या संख्याशास्त्रज्ञांसमवेत लिहीलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक शिवाजी विद्यापीठामार्फत अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या विषयांमागील गणिती व सैद्धांतिक पाया समजावून सांगणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक स्वरुपाचे आहे.
‘मॅथेमॅटिक्स बिहाइंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ असे पुस्तकाचे शीर्षक असून डॉ. शिर्के यांनी डॉ. सयाजी हांडे, विनीत गुप्ता आणि डॉ. सोमनाथ पवार यांच्यासमवेत ते लिहीले आहे. शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिले आहे. कुलगुरू शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, अध्यापन व संशोधन क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी एआय व डेटा अॅनालिटिक्सविषयक अनेक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. डॉ. हांडे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटयूट, कोलकाता येथून एम.स्टॅट. पदवीधारक असून, परड्यू विद्यापीठ (अमेरिका) येथून पीएच.डी. पूर्ण केली आहे. विनीत गुप्ता आयआयटी कानपूर येथून बी.टेक. आणि आयआयएम, अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून, मेटा (फेसबुक), अॅडोब, अॅडिडास यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एआय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. सोमनाथ पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, गेल्या दशकभरात ते अध्यापन, संशोधन व एआयशी संबंधित प्रकल्प मार्गदर्शनात सक्रिय आहेत.
शिवाजी विद्यापीठाने एआय व डेटा अॅनालिटिक्स या क्षेत्रात अभ्यासक्रम सुरु केले आहे. विद्यापीठाने केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता, नवीन ज्ञाननिर्मिती व प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. हे पुस्तक विद्यापीठातील कन्झ्युमर्स स्टोअर्स येथे आणि अमेझॉन इंडियावर ऑनलाईन स्वरूपात माफक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.