आपवर आरोप करणारा टिप्पर चालक हा ठेकेदाराचा मावसभाऊ ! महापालिकेतील कारभारीही समोर आणणार
schedule27 Dec 24 person by visibility 102 categoryमहानगरपालिका
किमान वेतन २५ हजार मात्र टिप्पर चालकांच्या हाती पंधरा हजार ! ठेकेदारांनी एक कोटी रक्कम लाटली !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्या टिप्पर चालकावर दबाव टाकून आप वर आरोप केले गेलेत तो एका ठेकेदाराचा मावसभाऊ आहे. तसेच या चालकाला देखील पंधरा हजारच पगार दिला जात असल्याचे पी एफ कार्यालयाकडे जमा केलेल्या कागदपत्रामध्ये दिसते. हे सर्व आरोप बदनामी करण्यासाठी तसेच घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. ज्यांनी आरोप केलेत त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला जाणार असल्याचे आम आदमी पक्षातर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
चालकांना किमान वेतनानुसार २५ हजार ३०० इतके वेतन देणे बंधनकारक आहे. परंतु फक्त पंधरा हजार रुपयांप्रमाणे त्यांचा पगार करून १९० चालकांचे मागील आठ महिन्यात चालकांच्या पगारातून एक कोटीहून अधिक रक्कम ठेकेदारांनी लाटली. चालकांचे बँक स्टेटमेंट व ठेकेदारांनी पी एफ ऑफिसला सादर केलेल्या कागदपत्रांमधून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून ती अडीच कोटीचा आहे.
देसाई म्हणाले, ‘घोटाळा झाला नाही तर मग चालकांच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गायब का करण्यात आले असा सवाल आपने उपस्थित केला. टिप्पर चालकांवर कंत्राटदारांनी दबाव टाकला जात आहे. परंतु याच चालकांनी आमच्याकडे त्यांची कागदपत्रे दिली आहेत. रक्षक कंपनीने महापालिकेकडे जमा केलेल्या पी एफ चलनात एकही टिप्पर चालक नसल्याचे समोर आले आहे. साई एजेंसीने पी एफ कार्यालयाकडे जमा केलेल्या माहितीनुसार ते ग्रॉस वेतन म्हणून फक्त पंधरा हजारच कमचाऱ्यांना देत असल्याचे समोर आले आहे. व्ही डी के फॅसिलिटी या कंपनीने जमा केलेल्या पगाराच्या नोंदी असलेले स्टेटमेंटमध्ये ते पंधरा हजार पेक्षा कमी पगार देत असल्याचे दिसत आहे.
महापालिकेकडून ठेकेदारांचे स्थानिक प्रतिनिधी कोण याची माहिती मागवली असून हा ठेका महापालिकेतल्या कोणत्या कारभाऱ्याकडे आहे ते लवकरच समोर येईल असा दावा शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला आहे. याप्रसंगी अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, मयुर भोसले, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, प्राजक्ता डाफळे, प्रतीक माने, सचिन पाटील आदी उपस्थित होते.