विद्यापीठ फंडाचा वापर अॅडव्हान्स सॅलरीसाठी की विकासकामासाठी ? सिनेटमध्ये सदस्यांचा प्रशासनाला खडा सवाल
schedule28 Dec 24 person by visibility 104 categoryशैक्षणिक
सव्वा बारा तास चालली विद्यापीठ सिनेटची सभा ! १७ ठराव मान्य, ५९ ठराव मागे !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अॅडव्हान्स सॅलरीची रक्कम ६६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असेल तर विद्यापीठ फंड नेमका पगारासाठी आहे की विकासकामासाठी ? असा खडा सवाल सिनेट सदस्यांनी केला. विद्यापीठ फंडातील रक्कम अजून किती वर्षे सॅलरीसाठी वापरणार ? केवळ नोंद घेतो असा अभिप्राय नोंदवून हा विषय सुटणार नाही तर अॅडव्हान्स सॅलरीसाठी काही धोरणे आखायला हवीत अशी भूमिका मांडली. २०२३-२४ चे वार्षिक लेखे, ताळेबंदपत्रक व लेखापरीक्षण अहवाल ठरावावर जोरदार चर्चा झाली. ऑडिटरने लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढले असल्याचे निदर्शनास आणून देत सदस्यांनी कामकाजाचे वाभाडे काढले. सभाध्यक्ष कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी याविषयी समिती स्थापन करण्याची व पुढील आठवडयापासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
शिवाजी विद्यापीठाच्या शुक्रवारी (२७ डिसेंबर २०२४) झालेल्या अधिसभेसमोर ७९ ठराव चर्चेसमोर मांडले होते. सिनेट सदस्य प्रा. निवासराव वरेकर यांनी बोलताना बनावट पावत्या करुन विद्यापीठाची फसवणूक करणाऱ्या संबंधित कॉलेजवर कारवाईची मागणी केली. या प्रकाराची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. यावर त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी होत असल्याचे सांगण्यात आले.सव्वा बारा तास चाललेल्या सभेत सतरा ठराव मान्य करण्यात आले. ५९ ठराव मागे घेतले. सभेत एक ठराव बहुमताने अमान्य करण्यात आला. सकाळी दहा वाजता सुरू झालेली सभा रात्री सव्वा दहापर्यंत चाचली. प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रकुलगुरु पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य आर. व्ही. शेजवळ यांनी, २०२३-२४ चे वार्षिक लेख, ताळेबंदपत्रक व लेखापरीक्षण अहवाल सादर केला. सदस्य रतन कांबळे यांनी या अहवालात ऑडिटरने अनेक विषयावर ताशेरे ओढले आहेत. यामुळे हा विषय मंजूर करण्याची मानसिकता नाही असे प्रथमदर्शनी स्पष्ट केले. सदस्य प्रकाश कुंभार, डी. एन. पाटींल, श्रीनिवास गायकवाड, संजय परमाणे, अभिषेक मिठारी. यांनी चर्चेत सहभागी होताना त्रुटी निदर्शनास आणल्या. लेखा परीक्षणाच्या मारलेल्या ताशेरेचा आधार घेत अॅडव्हान्स सॅलरीचा मुद्दा उपस्थित केला. २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीतील आर्थिक वर्षात अॅडव्हान्स सॅलरीची आकडेवारी सभागृहासमोर मांडत हा फंड नेमका कशासाठी ? अशी विचारण कुंभार यांनी केली. प्राचार्य शेजवळ यांनी याप्रश्नावर बोलताना सरकारी विभागाकडून येणे शिल्लक असल्याने ही रक्कम दिसते. विद्यापीठ फंडावर कोणताही परिणाम झाला नाही असे निदर्शनास आणले.
मंजूर करण्यात आलेल्या ठरावात संलग्नीकरणाच्या फीमध्ये सहा वर्षांनी वाढ करणे, सर्व महाविद्यालयांच्या प्रवेश माहितीपत्रकांमध्ये विद्यार्थीकेंद्रित माहितीचा समावेश करणे. शिवाजी विद्यापीठातील स्पोर्टस कॉम्प्लेक्ससाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा, झोनल व इंटरझोनल स्पर्धा आयोजनाच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करणे, डिजीटल रेडिओ स्टेशन सुरू करणे, शिवाजी विद्यापीठात आर्चरी स्पोटस व रायफल शूटिंगसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे, खेळाडूंचा भत्ता वाढविणे याविषयांचा समावेश आहे. चर्चेत डॉ. मंजिरी मोरे, डॉ. प्रताप पाटील, श्वेता परुळकेकर, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. मनोज गुजर, डॉ. ज्ञानदेव काळे, डॉ. शाहीन पटेल,अजित पाटील, विष्णू खाडे, काव्यश्री नलवडे, अमित जाधव, डॉ. मनोजकुमार पाटील, डाी. मनोज गुजर, शशीभूषण महाडिक आदींनी सहभाग घेतला. धैर्यशील यादव यांनी, विद्यापीठाने आयएमएस सॉफ्टवेअर तयार करण्यासंबंधीचा विषय मांडला.