वास्तव्य कोल्हापुरातच, बिले टूर्स-हॉटेलची ! गाडी डिझेलवर चालणारी-बिल पेट्रोलचे !!
schedule28 Dec 24 person by visibility 250 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या २०२३-२४ च्या वार्षिक लेखे, ताळेबंदपत्रक व लेखापरीक्षण अहवालावरील चर्चेदरम्यान सिनेटमध्ये वेगवेगळया गोष्टीवर सदस्यांनी प्रकाशझोत टाकला. लेखा परीक्षकांनी ओढलेल्या ताशेरेचा उल्लेख करत सदस्यांनी, काही मंडळीकडून नियमांना फाटा देत होणाऱ्या कामकाजाचा पर्दाफाश केला. शुक्रवारी (२७ डिसेंबर) झालेल्या अधिसभेत हे विषय गाजले
सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी हे प्रकरण समोर आणले. अर्थशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाची राज्य सरकारच्या एका प्रोजेक्टसाठी काम करण्यासाठी निवड झाली. मात्र प्रोजेक्टच्या कामासाठी मिळालेल्या अनुदानातून संबंधितांनी त्यासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ खरेदी करण्याची आवश्यकता होती.मात्र त्यांनी संदर्भ ग्रंथ खरेदी करण्याऐवजी फिक्शन-नॉन फिक्शन पुस्तके खरेदी केली. शिवाय त्यांनी प्रकल्प कामासाठी मुंबई, पुणे व कोल्हापुरात काम करावयाचे होते. त्यांनी प्रकल्पसाठी काम करताना कोल्हापुरातील हॉटेलमधील बिले जोडली आहेत. बाहेरगावचे दौरे दाखविताना कोल्हापुरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून बिले घेतली. ही टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी विद्यापीठाच्या विविध कामांशी निगडीत असल्याचे मिठारी यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यासंबंधी आदेश काढले. प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे यंत्रणा राबविली. सगळयांसाठी एकाच एजन्सीजकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असते तर विद्यापीठाच्या खर्चात बचत झाली असती. विद्यापीठाच्या वेलफेअर फंडाचे ऑडिड झाले नाही. विविध विभागासाठी खरेदी झालेल्या फर्निचरची तपासणी झाली नाही. मान्यता न घेता मानसशास्त्र विभागााने दोन लाख रुपयांच्या सॉफ्टवेअर खरेदी केली. डेटा सेंटरच्या एक कोटी अठरा लाख रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत चुका आहेत. विद्यापीठाचा कारभार हा पारदर्शक पद्धतीने होऊन लौकिक कायम टिकावा अशी भूमिका सदस्यांनी मांडली.
सिनेट सदस्य संजय परमणे यांनी टीएडीएच्या बिलातील विसंगतीवर प्रकाशझोत टाकला. टीएडीए अंतर्गत एका विभागात डिझेलवरील मोटार वापरली. डिझेलवरील पास दिला होता. मात्र संबंधितांनी पेट्रोलची गाडी दाखवून ७४०८ रुपये इतकी जादा रक्कम घेतली. हा सारा प्रकार गंभीर असल्याचे सभागृहाला सांगिततले. परमणे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर प्रशासनाकडून बोलताना प्राचार्य आर. व्ही. शेजवळ यांनी ज्यांनी जादा रक्कम घेतली होती, त्यांच्याकडून वसुली करण्यात येत असल्याचे सभागृहाला सांगितले.