शिक्षक बँकेच्या सभेला गोंधळाचे ग्रहण, एकमेकांच्या उणीदुणीवरुन खडाजंगी ! विरोधकांचा सभात्याग, सत्ताधाऱ्यांची मोठी घोषणा !!
schedule07 Sep 25 person by visibility 1474 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बँकेच्या घटलेल्या ठेवी, कमी झालेले कर्ज वितरण, थकबाकीत झालेली वाढ, नफ्याचा फुगवटा यावरुन विरोधी आघाडीने चढविलेला हल्लाबोल आणि सत्ताधारी संचालक मंडळाने, २०२२ पूर्वीच्या बँकेच्या कारभाराचा पर्दाफाश करताना मागील संचालक मंडळाचे काढलेले वाभाडे यामुळे दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. विरोधकांनी चेअरमनसहित संचालक मंडळावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत. बँकेच्या चालू वार्षिक अहवालवर चर्चा न करता मागील कारभारावर किती दिवस चर्चा करणार ? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनी, मागील संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे दोन वेळा लाभांशाचा भोपळा फोडता आला नाही. सभासदांना झालेल्या आर्थिक नुकसानीचे पाप कुणाचे ? असा पलटवार केला. सव्वा तासाच्या प्रास्ताविकानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली, मात्र विरोधी आघाडीच्या सभासदांचे प्रश्न डावलले जात असल्याचा आरोप करत निषेध नोंदवित विरोधी आघाडीने सभात्याग केला. यामुळे यंदाही शिक्षक बँकेला लागलेले गोंधळाचे ग्रहण काही सुटले नाही.
दरम्यान या सभेत चेअरमन शिवाजीराव रोडे पाटील यांनी शिक्षक बँकेतर्फे कर्ज मर्यादा ५० लाखापर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच लवकरच दोन अंकी लाभांश, आणि कर्जावरील व्याजदर एक अंकी करू अशी घोषणा केली. विरोधकांच्या सभात्यागानंतरही सत्ताधारी संचालक मंडळांनी सभा चालू ठेवत प्रश्नोत्तराचा तास पूर्ण केला. बँकेच्या गेल्या वर्षभरातील कामकाजावरुन आरोप, प्रत्यारोप झाल्याने यंदाची सभा गाजणार हे निश्चित होते. त्याची झलक सभेच्या पाहावयास मिळाली. विरोधी आघाडीची मंडळी, सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजाविरोधातील फलक हाती घेऊन सभास्थळाबाहेर उभे होते. दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली.
सत्य तेच सांगणार. ‘हवेत बार…पन्नास ठार’ अशा गोष्टी करणार नाही
एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास चेअरमन शिवाजीराव रोडे पाटील हे प्रास्ताविकासाठी उभे राहिले. त्यांनी, सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकार उत्तर मिळेपर्यंत व बँकेच्या कामकाजाचा पै-पैचा हिशेब मांडेपर्यंत सभा चालू राहील असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले. ‘आपण सत्य तेच सांगणार. ‘हवेत बार…पन्नास ठार’ अशा गोष्टी करणार नाही.’असे सांगत चेअरमन पाटील यांनी बँकेच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरी व यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा तक्ता स्क्रीनवर दाखविण्यास सुरुवात केली. मी तुलना करता नाही. पण बँकेच्या प्रगतीचा अहवाल मांडत आहे. यंदा आम्ही साडे सात टक्के लाभांश दिला आहे. मागील सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत २०११-१२ व २०१२-१३ मध्ये शून्य टकके लाभांश दाखविला आणि सभासदांच्या हाती भोपळा दिला अशा शब्दांत डिवचले.चेअरमन पाटील यांनी पूर्वीच्या संचालक मंडळाने ४३ कोटीचे सरकारी कर्ज रोखे कमी दराने विकले, यामुळे बँकेला दरवर्षी ५७ लाख रुपयांच फटका बसत आहे, याला जबाबदार कोण ? असा सवाल केला.
मागील गोष्टी उगाळू नका, बँकेची अधोगती होतेय त्यावर बोला
चेअरमनांच्या या विधानाला विरोधी आघाडीचे संभाजी बापट, राजमोहन पाटील, बबन केकरे, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे, प्रशांत पोतदार सर्जेराव सुतार, श्वेता खांडेकर, डी. पी. पाटील, बी. एस. पाटील, आदींनी जोरदार आक्षेप घेतला. ‘मागील गोष्टी उगाळत बसण्यापेक्षा, तुमची तीन वर्षाची कामगिरी काय ? तुमच्या कालावधीत बँकेची घसरण होत आहे. नफा घटला, ठेवी कमाी झाल्या, कर्ज वितरण कमी झाले. सभासद संख्या कमी होत आहे. हे कशाचे लक्षण आहे, तुमच्या कामकाजावर बोला. सभा मनमानी व हुकूमशाही पद्धतीने चालवू नका.’ असा घोषा विरोधी आघाडीने लावला. पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील यांनी चालू वर्षाच्या वार्षिक अहवालावर बोला. ज्यांच्यावर टीका करताय त्या संचालक मंडळात तुमचे नेते सामील होते अशा खोचक टोला मारला. बँकेल
सभासदांना सहकाराचे प्रशिक्षण ते तुमच्याकडून सहकार शिकण्याची आवश्यकता नाही
मार्जिन कमी असताना, बँकेला नफा झाला हीच विरोधकांची पोटदुखी असल्याचा फटका चेअरमनांनी लगाविला. सभासदांचा अढळ विश्वास, खर्चात काटकसर, पारदर्शक कारभार, कर्मचाऱ्यांशी पाच वर्षाचा वेतन करार, रजा रोखे पद्धतीत बदल केल्यामुळे बँकेची प्रगती होत असल्याचे सांगताना उपस्थित सभासदामध्ये अनेकजण पतसंस्थेचे संचालक आहेत, त्यांना मी सहकाराचा प्रशिक्षण देत आहे अशी वक्तव्ये केली. ग्रामीण भाषेतील शब्दांचा वापर करत विरोधकांना डिवचण्याचा प्रकाराने विरोधी आघाडी आक्रमक झाली. त्यांनी, एकत्रितपणे, सत्ताधाऱ्यांचा गेल्या तीन वर्षातील कारभार व चालू वर्षात बँकेची ठेवी, कर्ज व नफा अशा विविध टप्प्यावर झालेल्या घसरणीवरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. अध्यक्षांच्या समोर येऊन जोरजोरात बाजू मांडू लागले तर व्यासपीठावरुन सत्ताधारी संचालकही पुढे येऊन त्याला प्रतिवाद करू लागले यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ‘चेअरमनांनी चालू वार्षिक अहवालावर बोलावे, बँकेच्या आर्थिक स्थितीवर सांगावे, सभासदांना सहकार शिकवण्याची भाषा करू नये. तुमच्याकडून सहकार शिकण्याची आवश्यकता नाही’असे बजावले. यावरुन सत्ताधारी व विरोधी आघाडीत खटके उडाले. माईक हिसकावून घेण्याचा प्रकारही घडला. सुकाणू समितीमधील रवी पाटील, सुनील पाटील, प्रमोद तौंदकर यांनी सभा शांततेत होऊ दे, सगळयांनी शांत राहा असे आवाहन केले. मात्र गोंधळाची स्थिती कायम राहिली.
चर्चेविना विषयपत्रिका मंजूर
चेअरमनांच्या लांबलेल्या प्रास्ताविकावरही सभेत चर्चा होऊ लागली. दुपारी दोन वाजून २३ मिनिटाच्या सुमारास चेअरमन रोडे पाटील यांनी प्रास्ताविक संपविले. दरम्यान त्यांनी, सभासद ठेव वर्गणी एक हजार रुपये करण्याचा विषय गोंधळातच मंजूर करुन घेतला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. तीन मिनिटात तेरा विषय विना चर्चा मंजूर झाले. यानंतर दुपारी अडीच वाजता प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. विरोधी आघाडीच्या सभासदांनी आपणाला बोलू दिले जात नाही, सत्ताधाऱ्यांचा कारभार चुकीच्या पद्धतीने आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगत सभात्याग केला. यानंतरही सभा चालू राहिली. सभेला व्हाईस चेअरमन सुरेश कोळी, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, राजेंद्र पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर, अमर वरुटे, रामदास झेंडे, एस. व्ही. पाटील, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गजानन कांबळे, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, गौतम वर्धन आदी उपस्थित होते.