चेअरमनांनी त्यांच्या कोटयातील जागा शिरोळच्या नेत्याला दिली, त्यांचा नातेवाईक बँकेत नोकरीला-राजमोहन पाटील
schedule07 Sep 25 person by visibility 358 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेत मुलगा, भाचा आणि पुतण्याला नोकरी लावणार ही चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील यांची वल्गना खोटी आहे.. बँकेत आठ ते दहा कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान चेअरमन पाटील यांनी त्यांच्या वाट्याला आलेली जागा सत्तारुढ आघाडीच्या शिरोळमधील नेत्याला दिली. त्या नेत्याचा नातेवाईक बँकेत नोकरी करत आहे. यामुळे चेअरमन पाटील हे खोटेनाटे सांगून सभासदांची दिशाभूल करत आहेत.’असा पलटवार शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी केला.
प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्ने डावलली व बोलण्यासाठी संधी नाकारत असल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप करत विरोधी आघाडीने सभात्याग केला. प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व बँकेतील सभासदांनी, सभास्थळाबाहेर येऊन जोरदार निदर्शने केली. ‘हुकूमशाही पद्धतींने कामकाज करणाऱ्या संचालक मंडळाचा धिक्कार असो, गावगुंड चेअरमनांचा धिक्कार असो, गावढंळ भाषेचा वापर करत सभासदांचा अपमान करणाऱ्या चेअरमनांचा धिक्कार असो’अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधी आघाडीच्या सभासदांनी समांतर सभा घेतली.
बँकेचे माजी अध्यक्ष संभाजी बापट म्हणाले, ‘सत्ताधारी संचालक मंडळाने दाखविलेल्या नफ्यावर शासकीय लेखा परीक्षकांनी ताशेरे ओढले आहेत. जवळपास ६५ लाख इतका नफा बोगस दाखविला आहे. सभासद ठेव रक्कमेतही वाढ करण्याचा निर्णय मान्य नाही. हुकुमशाही पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा कामकाज सुरू असून या साऱ्या प्रकाराविरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व सहकार विभागाकडे दाद मागणार आहोत.’
जिल्हाध्यक्ष बबन केकरे यांनी ‘ वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमनांनी एकाधिकारशाही पद्धतीने सभा चालवली. सभासदांच्या विचारला थारा दिला नाही सत्ताधारी संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास गमाविला आहे.’असा आरोप केला. महिला आघाडीच्या श्वेता खांडेकर म्हणाल्या, ‘सत्ताधारी संचालक मंडळाकडे चांगले काम केले हे सांगण्यासाठी मुद्दा नाही. म्हणून ते प्रत्येकवेळी तुलना करतात. राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाच्या कालावधीत व्याज दर सोळा टक्केवरुन दहा टक्क्यावर आणला. हे सभासदांना माहित आहे.’
………………….
‘‘वार्षिक अहवालातील विषयावर सभासदांना बोलू न देता हुकूमशाही पद्धतीने सभा चालविण्याचा प्रयत्न झाला. आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे नीट उत्तर दिले नाही. मागील कारभारावर टिमकी वाजवून आपला गैरकारभार झाकाळण्याचा खटाटोप सत्ताधाऱ्यांनी केला. नफा बोगस असल्याचे लेखा परीक्षण अहवालात सिद्ध झाले आहे. गैरकारभाराविरोधात सहकार विभागाकडे दाद मागणार आहोत.”
-प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना